“भाजपाच्या जुन्या गटाचा दावा पुन्हा बलवत्तर; नगराध्यक्षपदासाठी विलासराव काळेबाग यांना उमेदवारी द्यावी;आनंदराव देशमुख यांची मागणी!”
मा. श्री. विलास काळेबाग ( भाजपा सरचिटणीस सांगली जिल्हा)
आटपाडीत भाजपात पुन्हा जुन्या गटाची चळवळ; अण्णासाहेब डांगे, बंडोपंत देशमुख यांच्या कार्याचा दाखला देत उमेदवारीची जोरदार मागणी
मा. श्री. आनंदराव देशमुख ( भाजपा पंचायत राज्य आटपाडी तालुका संयोजक )
आटपाडी (kd24newz):आगामी आटपाडी नगरपंचायत निवडणुकीसाठी नगराध्यक्षपद ओबीसी आरक्षित असल्याने भारतीय जनता पक्षामध्ये उमेदवार निवडीची हालचाल वेगाने सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाच्या जुन्या गटाकडून सांगली जिल्हा सरचिटणीस विलासराव काळेबाग यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्यात यावी, अशी ठाम मागणी पक्षाचे पंचायत राज तालुका संयोजक आनंदराव देशमुख यांनी केली आहे.
देशमुख यांनी सांगितले की, “भाजपाच्या जुन्या गटाने पक्षबांधणीसाठी जिवाचे रान केले आहे. 1985 ते 1992 या काळात आटपाडी ग्रामपंचायतीत माननीय बंडोपंत (दादा)देशमुख यांनी उपसरपंच म्हणून कार्य करताना न्यायासाठी झगडत ग्रामविकासात मोलाचे योगदान दिले. त्याच काळात माननीय आप्पासाहेब काळेबाग सर यांनी ग्रामपंचायत सदस्य म्हणून ग्रामविकासाची उत्कृष्ट परंपरा निर्माण केली. 1990 ते 1999 दरम्यान खानापूर-आटपाडी विधानसभा क्षेत्रातून उमेदवारी दिली असता, 1999 साली बंडोपंत (दादा)यांनी पक्षाला तब्बल बारा हजार मताधिक्याने विजय मिळवून दिला होता,” असे देशमुख यांनी स्मरण करून दिले.
ते पुढे म्हणाले की, “अण्णासाहेब डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ नेते बंडोपंत देशमुख, आप्पासाहेब काळेबाग सर व आमच्या जुन्या गटाने पक्षाला स्थिरता दिली. त्यामुळे आज पक्षाचे भक्कम पायाभूत काम झाले आहे. अशा स्थितीत आगामी नगरपंचायतीत जुन्या गटातील कार्यकर्त्यांना योग्य सन्मान मिळावा, त्यांना उमेदवारीत प्राधान्य द्यावे, हीच आमची नम्र मागणी आहे.”
आनंदराव देशमुख यांच्या या मागणीमुळे आटपाडीतील भाजपाच्या राजकारणात नवचैतन्य निर्माण झाले आहे. जुन्या गटातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून पक्षाच्या स्थानिक समीकरणांमध्ये यामुळे नवे वारे वाहू लागल्याची चर्चा तालुकाभर रंगली आहे.
आटपाडीच्या राजकारणात या मागणीने खळबळ उडाली असून येत्या काही दिवसांत भाजपाच्या उमेदवार निवडीवर सर्वांचे लक्ष लागले आहे.