Sanvad News आटपाडी नगरपंचायत उमेदवारीचा महापूर! शेवटच्या दिवशी ९१ अर्ज दाखल!

आटपाडी नगरपंचायत उमेदवारीचा महापूर! शेवटच्या दिवशी ९१ अर्ज दाखल!

Admin

 आटपाडी नगरपंचायत उमेदवारीचा महापूर! शेवटच्या दिवशी ९१ अर्ज दाखल!


नगराध्यक्ष पदासाठी १२ तर नगरसेवक पदासाठी ७९अर्ज...!उमेदवारांमध्ये ए-बी फॉर्मचा गोंधळ;

आटपाडी kd24newz ; नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी आज दि. १७ नोव्हेंबर हा नामनिर्देशन दाखल करण्याचा शेवटचा दिवस ठरला असून, आज अखेर आलेल्या अर्जांची संख्या तब्बल ९१ वर पोहोचली आहे. यात नगराध्यक्ष पदासाठी १२ अर्ज, तर नगरसेवक,सदस्य पदासाठी ७९ अर्ज दाखल झाले.

   यापूर्वी दाखल झालेल्या अर्जांचा मिळून आजपर्यंत एकूण अर्जांचा आकडा थेट २१९ वर गेला आहे.

यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी एकूण : २२ अर्ज तर नगरसेवक पदासाठी एकूण : १९७ अर्ज आले आहेत.

   या प्रचंड अर्जसंख्येमुळे आगामी निवडणुकीत कोणती रोचक लढत रंगणार याबद्दल उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. तालुक्याचे राजकीय वातावरण अक्षरशः तापले असून प्रत्येक प्रभागात तुफान स्पर्धा निर्माण झाली आहे.

    उद्या दि. १८ नोव्हेंबर रोजी अर्जांची छाननी होणार असून, २१ नोव्हेंबरपर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे. अनेकांनी पक्षांकडून AB फॉर्म जोडून दिले असून, कोणाचा एबी फॉर्म निश्चित झाला आहे, कोणाचा राहिला आहे, याबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. अनेक प्रभागांमध्ये बंडखोर उमेदवारांचेही संकेत जास्त दिसत असून पुढील दोन दिवस राजकीय समीकरणांमध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

    नगरपंचायत निवडणुकीत या वेळी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. नेतृत्त्वाकडून तासागणिक बैठका, चर्चासत्रे, समन्वय करण्याचे प्रयत्न सुरू असून, प्रत्येक प्रभागात मतदारांशी संपर्क वाढविण्यासाठी सर्वच पक्षांची धावपळ शिगेला पोहोचली आहे.

   या अर्जसंख्येमुळेच आटपाडीत आगामी निवडणुकीत त्रिकोणी ते चतुर्भुज लढती दिसण्याची शक्यता असून, मतदारांच्या मनाचा थांगपत्ता घेताना पक्षांना कसरत करावी लागणार आहे. एकंदरित निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आटपाडी शहरात निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले असून सर्व चौकात चौकात चर्चा रंगताना दिसत आहेत.

To Top