Sanvad News तहसीलदारांच्या आदेशाची अंमलबजावणी न झाल्याने शेतकऱ्याचे तहसील कार्यालयासमोर बेमुदत अमरण उपोषण

तहसीलदारांच्या आदेशाची अंमलबजावणी न झाल्याने शेतकऱ्याचे तहसील कार्यालयासमोर बेमुदत अमरण उपोषण

Admin

 तहसीलदारांच्या आदेशाची अंमलबजावणी न झाल्याने शेतकऱ्याचे तहसील कार्यालयासमोर बेमुदत अमरण उपोषण


रस्ता खुला न केल्याने ऊसपीक धोक्यात; प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात आटपाडीत आंदोलन

आटपाडी kd24newz :तहसीलदार आटपाडी यांच्याकडील क्र. रस्ता/एस.आर./१७/२०२३, दिनांक १९ सप्टेंबर २०२४ रोजी दिलेल्या आदेशानुसार रस्ता खुला करून देण्यात यावा, या मागणीसाठी झरे (ता. आटपाडी) येथील शेतकरी अशोक शामराव भानुसे यांनी आज दि. १२ जानेवारी २०२६ पासून आटपाडी तहसील कार्यालयासमोर बेमुदत अमरण उपोषण सुरू केले आहे.

   झरे येथील मौजे झरे गावातील गट नं. ६१४ या जमिनीला पूर्वापार वहिवाटीचा रस्ता खुला करून देण्याबाबत मामलेदार कोर्ट अॅक्ट १९०६ चे कलम ५ अन्वये अर्ज दाखल करण्यात आला होता. सदर अर्ज शेतकरी अशोक भानुसे यांच्या आई कै. घुरपाबाई शामराव भानुसे यांनी दाखल केला होता. या अर्जावर तहसीलदार आटपाडी यांनी दि. १९/०९/२०२४ रोजी रस्ता खुला करण्याचा स्पष्ट आदेश दिला होता. तथापि, आदेश होऊनही आजतागायत प्रत्यक्षात रस्ता खुला करण्यात आलेला नसल्याचा आरोप अर्जदाराने केला आहे.

      दरम्यान, कै. घुरपाबाई भानुसे यांचे दि. १७/०६/२०२५ रोजी निधन झाले असून, त्यांच्या नावे असलेल्या जमिनीची वारस नोंद महसूल दप्तरी पूर्ण होऊन ७/१२ उताऱ्यावर अर्जदार अशोक भानुसे यांचे नाव लागलेले आहे. सदर जमिनीत सध्या ऊसपीक असून ते तोडणीस आले आहे. मात्र, एकमेव वहिवाटीचा रस्ता बंद असल्यामुळे ऊस बाहेर काढता येत नसून पीक सुकत व जळत असल्याने मोठ्या आर्थिक नुकसानीचा धोका निर्माण झाला आहे.

      याप्रकरणी आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी अर्जदाराने पोलिस बंदोबस्तासाठी आवश्यक शुल्क भरून मंडल अधिकारी खरसुंडी यांच्यासह रस्ता खुला करण्याचा प्रयत्न केला असता, आदेशातील नमूद रस्त्याऐवजी वेगळा रस्ता तयार करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

     तसेच, यातील विरोधकांनी अपील कालावधी संपल्यानंतर मुद्दामहून उपविभागीय अधिकारी विटा यांच्याकडे आर.टी.एस. अपील दाखल केले असून, त्या अपीलवर कोणताही स्थगिती आदेश नसल्याचेही अर्जदाराने नमूद केले आहे.

  रस्त्याच्या दक्षिणेकडील गट नं. ६१५ मधील अनिल पांडुरंग खिलारी, बिरुदेव पांडुरंग खिलारी तसेच उत्तरेकडील गट नं. ६१८ मधील राजाराम बाबा टिंगरे यांनी तहसीलदारांचा आदेश असतानाही बेकायदेशीररीत्या दगडी बांध घालून रस्ता अडविल्याचा आरोप अर्जदाराने केला आहे.

या सर्व बाबींसंदर्भात अर्जदाराने दि. २५/११/२०२५ व दि. २५/१२/२०२५ रोजी तहसील कार्यालयाकडे लेखी निवेदने दिली होती. मात्र, त्यावर कोणतीही ठोस कारवाई किंवा चौकशी न झाल्याने अखेर प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात बेमुदत अमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारल्याचे अशोक भानुसे यांनी सांगितले.

  उपोषणास समाज पक्ष व नागरिकांनी पाठिंबा दर्शवला असून यामध्ये बहुजन समता पार्टीचे जिल्हाध्यक्ष बळीराम रणदिवे यांनीही पाठिंबा दर्शवला आहे.

To Top