कामथ शाळेचा अभिनव उपक्रम; विद्यार्थ्यांचा ‘आनंदी आठवडी बाजार’ ठरला शिक्षणाचा जिवंत प्रयोग
व्यवहारज्ञान, आत्मविश्वास आणि सामाजिक भानाची घडण; पालक-ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग
आटपाडी kd24newz:विद्यार्थ्यांच्या पुस्तकी ज्ञानाला प्रत्यक्ष व्यवहाराची जोड देत आत्मविश्वास, संवादकौशल्य आणि आर्थिक शिस्त निर्माण व्हावी, या हेतूने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कामथ (ता. आटपाडी) येथे सोमवार, दि. १२ जानेवारी २०२६ रोजी ‘आनंदी आठवडी बाजार’ हा अभिनव उपक्रम उत्साहात राबविण्यात आला. या उपक्रमाला पालक, ग्रामस्थ तसेच विविध संस्थांचे प्रतिनिधी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
शालेय प्रांगणात भरलेल्या या बाजारात विद्यार्थ्यांनी स्वतः पिकवलेला भाजीपाला, घरगुती खाऊचे पदार्थ तसेच दैनंदिन वापरातील वस्तूंचे आकर्षक स्टॉल्स उभारले होते. “ताजी भाजी घ्या…”, “गोड खाऊ घ्या…” अशा चिमुकल्यांच्या आरोळ्यांनी परिसर दुमदुमून गेला. विक्री-खरेदीदरम्यान वजन-मोजमाप, दर ठरवणे, हिशोब ठेवणे आणि ग्राहकांशी संवाद साधणे या सर्व बाबींचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला.
या उपक्रमातून केवळ व्यवहारज्ञानच नव्हे, तर स्वच्छता, काटकसर, सहकार्य आणि अन्ननासाडी टाळण्याचा संदेश देण्यात आला. उरलेला खाऊ-भाजी नियोजनपूर्वक ग्रामस्थांपर्यंत पोहोचवून अन्नपूर्वक समाजकार्याचा आदर्श विद्यार्थ्यांसमोर ठेवण्यात आला. समाजाप्रती कृतज्ञता आणि सामूहिक जबाबदारीची जाणीव निर्माण करणारा हा उपक्रम विशेष ठरला.
या उपक्रमाचे उद्घाटन कामथ गावच्या सरपंच मा. सौ. कारंडे मॅडम व उपसरपंच मा. श्री. धर्मेंद्र पावणे यांच्या हस्ते झाले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. संतोषभाऊ देवडकर, मा. श्री. दशरथ कोकरे, आटपाडी बाजार समितीचे संचालक मा. श्री. सुनील सरक, मा. श्री. शिवाजी पाटील, मा. श्री. अशोक सरक सर, मा. श्री. देवीदास कोकरे, ग्रामपंचायत सदस्य, सहकारी संस्थांचे चेअरमन-व्हाइस चेअरमन व सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते. मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे कौतुक करत प्रत्यक्ष खरेदीचा आनंद घेतला.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. तुळशीराम गळवे सर यांच्यासह शिक्षक श्री. कुमार गळवे सर, श्री. संजय पिंजारी सर व श्री. स्वप्निल इनामदार सर यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांमध्ये व्यवहारचातुर्य, संघभावना आणि सामाजिक जाणीव निर्माण व्हावी, या दृष्टीने केलेले नियोजन सर्वत्र प्रशंसनीय ठरले.
आपल्या पाल्यांमधील आत्मविश्वास, बोलण्यातील सफाई आणि जबाबदारीची जाणीव पाहून पालक व ग्रामस्थ भारावून गेले. मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांनी खरेदी केली, त्यामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित झाला. “अशा उपक्रमांमुळे मुलांना भविष्यातील व्यवहारांचे शिक्षण प्रत्यक्ष अनुभवातून मिळते,” अशी भावना पालकांनी व्यक्त केली.
कामथ शाळेचा ‘आनंदी आठवडी बाजार’ हा उपक्रम शिक्षण, जीवनकौशल्ये आणि सामाजिक भान यांचा सुरेख संगम ठरला असून, इतर शाळांसाठी तो प्रेरणादायी उदाहरण बनला आहे.

