उपनगराध्यक्ष सौ. मीनाक्षी पाटील यांची आटपाडी नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी बिनविरोध निवड
आटपाडी kd24newz ;आटपाडी नगरपंचायत कार्यालयात पिठासन अधिकारी वैभव हजारे यांच्या अध्यक्षतेखाली नगरपंचायतीच्या विविध विषय समित्यांच्या बिनविरोध निवडी शांततापूर्ण वातावरणात पार पडल्या. या निवड प्रक्रियेत महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी उपनगराध्यक्ष सौ. मीनाक्षी मनोजकुमार पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून, नगरपंचायतीच्या सामाजिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या विभागाला सक्षम, संवेदनशील व लोकाभिमुख नेतृत्व लाभले आहे.
उपनगराध्यक्ष म्हणून कार्यरत असलेल्या सौ. मीनाक्षी पाटील या महिलांच्या प्रश्नांशी सातत्याने संवाद साधणाऱ्या, सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या आणि प्रशासकीय कामकाजाची उत्तम जाण असलेल्या नेत्या म्हणून ओळखल्या जातात. महिला व बालकल्याण समितीच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण, बचतगटांचे बळकटीकरण, महिला स्वयंरोजगार योजना, मातृ व बाल आरोग्य, पोषण आहार योजना तसेच बालकांच्या शिक्षण व संरक्षणाशी संबंधित उपक्रम प्रभावीपणे राबविण्याचा त्यांचा मानस आहे.
महिला व बालकल्याण समितीच्या उपसभापतीपदी मनिषा पाटील यांची निवड करण्यात आली असून, दोघींच्या नेतृत्वाखाली महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी, लाभार्थ्यांपर्यंत थेट पोहोच आणि गरजू घटकांना न्याय देण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. अंगणवाडी सेवा, किशोरी विकास योजना, महिला आरोग्य तपासणी शिबिरे व जनजागृती उपक्रमांना प्राधान्य दिले जाणार आहे.
निवडीनंतर पिठासन अधिकारी वैभव हजारे तसेच नगराध्यक्ष मा. उत्तम (यु. टी.) जाधव यांनी उपनगराध्यक्ष सौ. मीनाक्षी पाटील यांचे अभिनंदन करत, “महिला व बालकल्याण क्षेत्रात ठोस, परिणामकारक व लोकाभिमुख निर्णय घेऊन आटपाडी शहरासाठी आदर्श कार्यपद्धती निर्माण कराल” असा विश्वास व्यक्त केला.
याच बैठकीत नगरपंचायतीच्या इतर विषय समित्यांच्या निवडीही पार पडल्या असून, नियोजन व विकास, सार्वजनिक बांधकाम, पाणीपुरवठा व जलनिस्सारण, स्वच्छता व वैद्यकीय समित्यांनाही स्वतंत्र नेतृत्व मिळाले आहे. मात्र महिला व बालकल्याण समितीकडे विशेष लक्ष लागून असून, उपनगराध्यक्ष सौ. मीनाक्षी पाटील यांच्या नेतृत्वाखाली महिलांसाठी सुरक्षित, सक्षम व सन्मानजनक वातावरण निर्माण होईल, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
उपनगराध्यक्षपदासोबतच महिला व बालकल्याण समितीची धुरा सांभाळताना प्रशासन, सामाजिक जाणीव आणि लोकहिताचा समतोल साधणारे कार्य त्यांच्या हातून घडेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
