Sanvad News आटपाडी नगरपंचायतीच्या सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापतीपदी बाळासाहेब हजारे यांची बिनविरोध निवड

आटपाडी नगरपंचायतीच्या सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापतीपदी बाळासाहेब हजारे यांची बिनविरोध निवड

Admin

 आटपाडी नगरपंचायतीच्या सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापतीपदी बाळासाहेब हजारे यांची बिनविरोध निवड

आटपाडी प्रतिनिधी ; आटपाडी नगरपंचायत कार्यालयात पिठासन अधिकारी वैभव हजारे यांच्या अध्यक्षतेखाली नगरपंचायतीच्या विविध विषय समित्यांच्या बिनविरोध निवडी शांततापूर्ण वातावरणात पार पडल्या. या निवड प्रक्रियेत सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापतीपदी बाळासाहेब हजारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून, आटपाडी शहराच्या पायाभूत विकासाला दिशा देणाऱ्या महत्त्वाच्या विभागाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली आहे.

   बाळासाहेब हजारे हे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कामकाजाचा अनुभव असलेले, विकासाभिमुख दृष्टिकोन ठेवणारे आणि कामातून विश्वास निर्माण करणारे नेतृत्व म्हणून परिचित आहेत. सार्वजनिक बांधकाम समितीच्या माध्यमातून शहरातील अंतर्गत व मुख्य रस्त्यांचे मजबुतीकरण, सिमेंट काँक्रिट व डांबरी रस्त्यांची कामे, गटार व ड्रेनेजवरील संरचना, सार्वजनिक इमारतींची दुरुस्ती व नवी बांधकामे, तसेच नागरी सुविधांची गुणवत्ता वाढविणे या कामांना त्यांनी प्राधान्य देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

    विशेषतः शाळा, अंगणवाडी, दवाखाने, समाजमंदिरे, स्मशानभूमी, बसस्थानक परिसर, तसेच बाजारपेठेतील आवश्यक बांधकामे ही नागरिकांच्या दैनंदिन गरजांशी थेट संबंधित असलेली कामे असून, त्यांची वेळेत व दर्जेदार पूर्तता करण्यावर भर दिला जाणार आहे. बांधकाम कामांमध्ये पारदर्शकता, दर्जा नियंत्रण आणि निधीचा योग्य वापर यावर विशेष लक्ष दिले जाणार असल्याचे बाळासाहेब हजारे यांनी स्पष्ट केले आहे.

    निवडीनंतर पिठासन अधिकारी वैभव हजारे तसेच नगराध्यक्ष मा. यु. टी.जाधव यांनी बाळासाहेब हजारे यांचे अभिनंदन करत, “सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून शहराच्या विकासाचा पाया अधिक भक्कम कराल” असा विश्वास व्यक्त केला.

   याच बैठकीत नगरपंचायतीच्या इतर विषय समित्यांच्याही निवडी पार पडल्या असून, नियोजन व विकास, महिला व बालकल्याण, पाणीपुरवठा व जलनिस्सारण, स्वच्छता व वैद्यकीय समित्यांना स्वतंत्र नेतृत्व मिळाले आहे. मात्र शहर विकासाचा कणा मानल्या जाणाऱ्या सार्वजनिक बांधकाम समितीकडे नागरिकांचे विशेष लक्ष लागून आहे.

बाळासाहेब हजारे यांच्या नेतृत्वाखाली आटपाडी शहरात दर्जेदार, टिकाऊ व नागरिकाभिमुख पायाभूत सुविधा उभारल्या जातील, असा विश्वास स्थानिक नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

To Top