Sanvad News झरे येथील जिल्हा मध्यवर्ती बँक चोरी उघड

झरे येथील जिल्हा मध्यवर्ती बँक चोरी उघड

Admin

 झरे येथील जिल्हा मध्यवर्ती बँक चोरी उघड

३ कोटी २५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; उत्तर प्रदेशसह सांगलीतील चार आरोपी गजाआड


आटपाडी, ता. २१ (kd24newz) आटपाडी तालुक्यातील झरे येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत लॉकर फोडून करण्यात आलेल्या थरारक चोरीचा गुन्हा अखेर उघडकीस आला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली यांच्या शिताफीच्या तपासामुळे ३ कोटी २५ लाख ५४ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, उत्तर प्रदेश व सांगली जिल्ह्यातील एकूण चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे संपूर्ण तालुक्यात समाधान व्यक्त होत आहे.

     दि. ७ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५ ते ८ जानेवारी रोजी सकाळी ९.४५ वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी झरे येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेच्या पाठीमागील खिडकीची काच फोडून, गॅस कटरच्या साहाय्याने लोखंडी गज कापत बँकेत प्रवेश केला. त्यानंतर लॉकर रूममधील तब्बल २२ लॉकर फोडून ग्राहकांचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली होती. या प्रकरणी शाखाधिकारी हणमंत धोंडीबा गळवे यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन विशेष पोलीस महानिरीक्षक (कोल्हापूर परिक्षेत्र) श्री. सुनील फुलारी, पोलीस अधीक्षक श्री. संदीप घुगे व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी स्वतंत्र तपास पथके तयार केली.

सीसीटीव्हीचा डीव्हीआर आरोपी पळवून नेल्याने तपासात अडथळे येत होते. मात्र, तांत्रिक विश्लेषण, घटनास्थळाच्या आसपासचे मार्ग, तसेच गोपनीय बातमीदारांच्या माहितीच्या आधारे तपास अधिक गतीने पुढे नेण्यात आला.

     तपासात असे निष्पन्न झाले की, उत्तर प्रदेशातील राहुल रंजमीश शर्मा हा या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार असून, त्याने सांगली जिल्ह्यातील स्थानिक आरोपींच्या मदतीने हा चोरीचा कट रचला होता. आरोपी काही दिवसांपासून पलूस परिसरातील लॉजमध्ये वास्तव्यास होते.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने उत्तर प्रदेश व दिल्ली येथे छापे टाकून राहुल शर्मा यास अटक केली. तसेच सांगलीवाडी परिसरात चोरीचा मुद्देमाल विक्रीसाठी नेत असताना पांढऱ्या रंगाच्या स्कॉरपिओ वाहनासह उर्वरित तिघांना शिताफीने ताब्यात घेण्यात आले.

    या चोरीत अटक करण्यात आलेल्या आरोपीं राहुल रंजमीश शर्मा (वय २७, रा. ककराला, जि. बदायूं, उत्तर प्रदेश),

विश्वजीत विजय पाटील (वय २४, रा. बांबवडे, ता. पलूस),

संकेत अरुण जाधव (वय २६, रा. बलवडी, ता. खानापूर)

आणि इजाज राजु आत्तार (वय ३०, रा. आमनापूर, ता. पलूस) हे आहेत.

     कारवाईदरम्यान पोलिसांनी १.१६८ किलो सोन्याची लगड, २८.५० किलो चांदीचे विविध दागिने, ५०३ ग्रॅम सोन्याचे दागिने, रोख रक्कम, महिंद्रा स्कॉरपिओ वाहन, गावठी कट्टा, चार जिवंत काडतुसे, ऑक्सीजन सिलेंडर व गॅस सिलेंडर असा एकूण ३ कोटी २५ लाख ५४ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.


     सदरचे सर्व आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासासाठी आटपाडी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून, इतर साथीदारांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या या यशस्वी कारवाईमुळे झरेसह संपूर्ण आटपाडी तालुक्यात पोलीस प्रशासनाचे कौतुक होत आहे.

To Top