आटपाडीत ‘बोलींचा जागर’ : माणदेशी बोलीला मानाचा मुजरा
मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त २३ जानेवारी रोजी भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन
आटपाडी kd24newz ;मराठी भाषेतील विविध बोलींचे जतन, संवर्धन व लोकजीवनाशी असलेले नाते अधोरेखित करण्याच्या उद्देशाने ‘बोलींचा जागर’ हा माणदेशी बोली जागर कार्यक्रम दिनांक २३ जानेवारी २०२६ रोजी श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालय, आटपाडी येथे उत्साहात आयोजित करण्यात आला आहे.
महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभाग, भाषा संचालनालय, पुणे आणि श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालय, आटपाडी यांच्या संयुक्त विद्यमाने, मराठी भाषा संवर्धन पंधरवडा २०२६ अंतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. माणदेशी बोलीतील लोकसंस्कृती, परंपरा, कला व जीवनपद्धती यांचे दर्शन घडविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९ ते १० या वेळेत शोभायात्रा व ग्रंथदिंडीने होणार असून, त्यानंतर सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत मुख्य सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ साहित्यिक मा. डॉ. सयाजीराजे मोकाशी व साहित्यिक मा. डॉ. निलेश शेळके हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. डॉ. शिवाजीराव भोसले, प्राचार्य, श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालय, आटपाडी हे असतील.
कार्यक्रमात माणदेशी लोककलेचा ठेवा सादर केला जाणार असून,‘होलारांचे वाजप’ सचिन जावीर व सहकारी कलाकार (पिंपरी बुद्रुक),
‘विनोदी जुगलबंदी भारुड’ युवा भारुडकर संदीप मोहिते व अतुल हातेकर,तसेच ‘भेदिक शाहिरी व पोवाडा’ शाहीर जयवंत रणदिवे, युवा शाहीर डॉ. अमोल रणदिवे व सहकारी कलाकार (दिघंची) यांचे सादरीकरण होणार आहे.
यावेळी महाराष्ट्र शासनाचे अजित पोवार, भाषा अधिकारी, डॉ. संजय पवार, मराठी भाषा अधिकारी, तसेच नारायण जायभये, मुंबई हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमास नागरिक, साहित्यप्रेमी, विद्यार्थी व सांस्कृतिक क्षेत्रातील अभ्यासकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक प्रा. डॉ. विजय शिंदे यांनी केले आहे.
