आटपाडी एज्युकेशन सोसायटीच्या शिरपेचात मानाचा तुरा
संविधान जागृती’ परीक्षेत आटपाडीच्या दोन विद्यार्थिनींचे घवघवीत यश
आटपाडी kd24newz :दि आटपाडी एज्युकेशन सोसायटी, आटपाडीच्या शैक्षणिक इतिहासात प्रथमच राबविण्यात आलेल्या ‘माझी प्रतिज्ञा, माझे संविधान – राष्ट्रसंवेदना अभियान’ अंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबाबत जागृती निर्माण करणारा अभिनव उपक्रम यशस्वी ठरला आहे. या अभियानांतर्गत महाराष्ट्र शासनाच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी, सांगली यांच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या ‘संविधान जागृती’ परीक्षेत श्रीमती वत्सला देवी देसाई गर्ल्स हायस्कूल, आटपाडी येथील इयत्ता नववीत शिकणाऱ्या कुमारी अन्वयी धर्मेंद्र ढवळे व कुमारी वेदिका धनाजी गायकवाड या दोन विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
विशेष बाब म्हणजे, आटपाडी तालुक्यातून निवड झालेल्या एकूण २० विद्यार्थ्यांमध्ये केवळ या दोनच विद्यार्थिनींची निवड झाली असून, ही बाब तालुका, संस्था व प्रशालेच्या दृष्टीने अत्यंत अभिमानास्पद आहे. राज्यभरातून केवळ ४० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून त्यामध्ये आटपाडी तालुक्याच्या या दोन विद्यार्थिनींचा समावेश झाल्याने परिसरात समाधान व्यक्त होत आहे.
या यशस्वी विद्यार्थिनींचा दि. २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून विधान भवन, मुंबई येथे विशेष गौरव करण्यात येणार आहे.
हा उपक्रम दि आटपाडी एज्युकेशन सोसायटीचे आदरणीय चेअरमन मा. श्री अमरसिंह (बापूसाहेब) देशमुख यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आला. संस्थेचे सचिव श्री पवार ए. यु. सर, इन्स्पेक्टर श्री गायकवाड ए. के. सर, श्री नामदास पी. जी. सर व श्री चौगुले ए. बी. सर यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या सर्व शाखांमध्ये ‘माझी प्रतिज्ञा, माझे संविधान – राष्ट्रसंवेदना अभियान’ प्रभावीपणे राबविण्यात आले. या अभियानामुळे विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबद्दल जागरूकता, कर्तव्यभावना व लोकशाही मूल्यांची जाणीव निर्माण झाली आहे.
या यशाबद्दल दि आटपाडी एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन, सचिव, इन्स्पेक्टर्स, प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. मोकाशी मॅडम, पर्यवेक्षक जगताप सर, प्रशालेचा सर्व शिक्षकवृंद, विद्यार्थिनी, तसेच पालकवर्ग यांच्या वतीने या गुणवंत विद्यार्थिनींचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले आहे.
