Sanvad News आटपाडीच्या राजकारणात मोठी राजकीय उलथापालथ..!आमदार सुहास बाबर–राजेंद्रअण्णा देशमुख यांची महायुती जाहीर; एकनाथ शिंदे–अजित पवार यांच्या संमतीने ऐतिहासिक निर्णय..!

आटपाडीच्या राजकारणात मोठी राजकीय उलथापालथ..!आमदार सुहास बाबर–राजेंद्रअण्णा देशमुख यांची महायुती जाहीर; एकनाथ शिंदे–अजित पवार यांच्या संमतीने ऐतिहासिक निर्णय..!

Admin

 आटपाडीच्या राजकारणात मोठी राजकीय उलथापालथ..!


आमदार सुहास बाबर–राजेंद्रअण्णा देशमुख यांची महायुती जाहीर; एकनाथ शिंदे–अजित पवार यांच्या संमतीने ऐतिहासिक निर्णय..!

 

जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीत भाजपसमोर कडवे आव्हान..

आटपाडी kd24newz;आटपाडी तालुक्याच्या राजकारणात बुधवारी मोठी राजकीय खळबळ उडाली. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आमदार सुहास बाबर (शिवसेना) आणि माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख (राष्ट्रवादी काँग्रेस) यांनी अधिकृतपणे ‘महायुती’ची घोषणा पत्रकार परिषदेमध्ये केली. या नव्या राजकीय समीकरणामुळे तालुक्यातील राजकारणाला वेगळी दिशा मिळाली असून भाजपसमोर तगडे आणि थेट आव्हान उभे राहिले आहे.

      युतीची घोषणा करताना आमदार सुहास बाबर म्हणाले की, “शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही पक्षांतील सर्व प्रमुख नेत्यांशी सविस्तर चर्चा करूनच आम्ही एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. या युतीसाठी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांची संमती घेण्यात आली आहे.

तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही ही युती केवळ निवडणुकीपुरती मर्यादित न ठेवता, पुढील काळातही कायमस्वरूपी ठेवण्याचा प्रयत्न करू.”ते पुढे म्हणाले, “जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका शासनाच्या नियमांनुसार, आरक्षणाच्या चौकटीत आणि पारदर्शक पद्धतीने लढवण्यात येतील. या वेळी तालुक्यातील मतदार आमच्या विचारांबरोबर उभे राहतील आणि शिवसेना–राष्ट्रवादी युतीतील उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करतील, असा आम्हाला ठाम विश्वास आहे.”

    माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांनीही या युतीचे समर्थन करताना सांगितले की, “आमदार सुहास बाबर यांनी गेल्या काही वर्षांत तालुक्यात विकासकामांच्या माध्यमातून विश्वास निर्माण केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या निवडणुका पूर्ण ताकदीने, एकसंघपणे लढणार आहेत. उमेदवार ठरवताना जातीपेक्षा निवडून येण्याची क्षमता, जनाधार आणि काम करण्याची ताकद हा निकष ठेवण्यात आला आहे.”

     आरक्षणाच्या मुद्द्यावर स्पष्टीकरण देताना राजेंद्र आण्णा देशमुख म्हणाले की, “शासकीय नियमानुसार आरक्षण असले तरी अनेक ठिकाणी खुल्या प्रवर्गातून ओबीसी उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही, याची आम्ही काळजी घेतली आहे.”

    आमदार बाबर आणि माजी आमदार देशमुख हे आतापर्यंत एकमेकांचे राजकीय प्रतिस्पर्धी मानले जात होते. मात्र, या दोन मातब्बर नेत्यांच्या एकत्र येण्याने आटपाडी तालुक्यातील राजकीय गणिते पूर्णतः बदलली असून विरोधकांच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे.

      या महायुतीच्या घोषणावेळी तानाजीराव पाटील, सभापती संतोष पुजारी, विनायक मासाळ, अनिल पाटील, दत्ता पाटील, अशोक देशमुख, श्रीरंग कदम, विठ्ठल गवळी, अमोल मोरे, सोमनाथ देवकर, 

सत्यशील सवने, साहेबराव पाटील, P. N.कदम, नितीन पाटील यांच्यासह शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    या नव्या युतीमुळे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील लढत अधिक रंगतदार होणार असून आटपाडी तालुक्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

To Top