करगणीमध्ये राजकीय भूकंप! भाजपला मोठा धक्का, विद्यमान तीन ग्रामपंचायत सदस्यांचा शिवसेना–राष्ट्रवादी महायुतीला जाहीर पाठिंबा
आटपाडी kd24newz ;करगणी गावाच्या राजकारणात आज मोठा उलथापालथ करणारी घटना घडली असून भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे. करगणी ग्रामपंचायतच्या ४ नंबर वार्डातील भाजपचे तिन्ही विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मा. उत्तमराव माने (ट्रिपल ग्रामपंचायत सदस्य), मा. अभिजीत जाधव आणि मा. आण्णा कांबळे तसेच सौ. रूपाली आण्णा कांबळे यांनी भाजपला रामराम ठोकत शिवसेना–राष्ट्रवादी महायुतीत जाहीर प्रवेश केला आहे.
हा पक्षप्रवेश करगणी जिल्हा परिषद गटाचे शिवसेना–राष्ट्रवादी महायुतीचे अधिकृत उमेदवार माननीय विनायकराव मासाळ साहेब आणि करगणी पंचायत समिती गणाचे अधिकृत उमेदवार दत्तात्रय पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी दोन्ही उमेदवारांना करगणीतील ग्रामस्थांच्या साक्षीने जाहीर पाठिंबा देण्यात आला.
या निर्णयामुळे करगणीतील राजकीय समीकरणे पूर्णतः बदलली असून भाजपच्या स्थानिक गटाला मोठा धक्का बसल्याचे स्पष्ट चित्र आहे. दीर्घकाळ ग्रामपंचायतीत प्रभावी भूमिका बजावणाऱ्या या नेत्यांच्या पक्षबदलामुळे शिवसेना–राष्ट्रवादी महायुतीची ताकद लक्षणीयरीत्या वाढली आहे.
कार्यक्रमावेळी माननीय विनायकराव मासाळ साहेब यांनी बोलताना सांगितले की, “करगणीच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. सामान्य जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देणारे पारदर्शक आणि लोकाभिमुख नेतृत्व देण्याचा आमचा संकल्प आहे.” तर दत्तात्रय पाटील यांनी ग्रामस्थांच्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत विकासाची गती अधिक वेगाने वाढवण्याचे आश्वासन दिले.
या वेळी करगणी शिवसेनेतील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. फटाक्यांच्या आतषबाजीसह जल्लोषात हा पक्षप्रवेश पार पडला. एकूणच करगणीमध्ये झालेल्या या राजकीय घडामोडीमुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेना–राष्ट्रवादी महायुती अधिक मजबूत स्थितीत दिसून येत आहे.

