गारळेवाडीत विशेष श्रमसंस्कार शिबिराचा उत्साहात समारोप
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या श्रमदानातून गावात चैतन्य; सामाजिक जाणीवेचा जागर
आटपाडी : झरे..महाराणीदेवी अहिल्याबाई होळकर एज्युकेशन सोसायटी, सांगली संचलित पद्मभूषण डॉ. क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी कला महाविद्यालय, झरे आणि मौजे गारळेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १५ जानेवारी ते २१ जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचा समारोप कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या समारोप कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून गावचे पोलीस पाटील धनाजी गारळे उपस्थित होते. आपल्या मनोगतात ते म्हणाले की, “शिबिर सुरू झाल्यापासून गारळेवाडी गावातील वातावरण पूर्णतः बदलून गेले आहे. गावात एक वेगळेच चैतन्य निर्माण झाले असून याचा सकारात्मक परिणाम गावकरी तसेच शालेय विद्यार्थ्यांवर निश्चितच होणार आहे.”
विद्यार्थ्यांनी केलेले श्रमदान, स्वच्छता, सामाजिक उपक्रम आणि प्रबोधनात्मक कार्य कौतुकास्पद असल्याचेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य यांनी सांगितले की, “आमचे विद्यार्थी ज्या-ज्या गावात विशेष शिबिरासाठी जातात, तेथे सामाजिक बांधिलकी जपत उत्तम काम करतात. प्रत्येक गावाने आम्हाला नेहमीच उत्तम प्रतिसाद व सहकार्य दिले आहे. यंदा गारळेवाडी गावानेही अत्यंत सकारात्मक आणि आपुलकीचे सहकार्य केले. जसा या शिबिराचा फायदा गावाला झाला, तसाच मौल्यवान अनुभव आमच्या विद्यार्थ्यांनाही मिळाला आहे. या गावातून विद्यार्थ्यांना खूप काही शिकायला मिळाले.”
यापूर्वी आपल्या प्रास्ताविकात कार्यक्रम अधिकारी प्रा. एम. डी. खांडेकर यांनी संपूर्ण शिबिराचा सविस्तर आढावा मांडत विविध उपक्रम, श्रमदान, जनजागृती व सामाजिक कार्याची माहिती उपस्थितांना दिली.
या कार्यक्रमास गारळेवाडी गावचे सरपंच अनिल गारळे, उपसरपंच कमल देवकते, प्रतिष्ठित नागरिक, ग्रामस्थ, स्वयंसेवक व स्वयंसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सौ. काळेल यांनी केले, तर आभार प्रा. देवकुळे डी. एस. यांनी मानले.
विशेष श्रमसंस्कार शिबिरामुळे गावातील सामाजिक सलोखा, स्वच्छतेबाबतची जाणीव आणि युवकांमध्ये सेवाभावी वृत्ती वृद्धिंगत झाल्याचे समाधान ग्रामस्थांनी व्यक्त केले.
