नावीन्यपूर्ण प्रचाराची चर्चा; निंबवडेत विद्याताई मोटेंना जनतेचा प्रचंड पाठिंबा
पथनाट्याच्या माध्यमातून विकासाचा संदेश; ‘इंद्र–नारद’ संवाद
आटपाडी kd24newz :निवडणूक प्रचाराला केवळ भाषणांपुरते मर्यादित न ठेवता नावीन्यपूर्ण आणि प्रभावी माध्यमांचा वापर करत शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार ॲड. विद्याताई सचिन मोटे यांनी निंबवडे गावात प्रचाराची वेगळीच छाप उमटवली. लोकसंपर्कासाठी पथनाट्याच्या माध्यमातून ‘इंद्र–नारद’ संवाद सादर करत विकासाची दिशा, लोकहिताचे मुद्दे आणि भविष्यातील आराखडा थेट जनतेसमोर मांडण्यात आला. या हटके संकल्पनेमुळे संपूर्ण गावात प्रचाराची जोरदार चर्चा रंगली.
सभा, पदयात्रा, कोपरा सभा यांसोबतच पथनाट्याचा समावेश केल्याने प्रचार अधिक प्रभावी ठरला. मनोरंजनासोबतच जनजागृती साधणाऱ्या या प्रयोगामुळे उपस्थित नागरिकांवर सकारात्मक प्रभाव पडला. सामान्य मतदारांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले. “राजकारणात असे नावीन्य हवेच,” अशा प्रतिक्रिया नागरिकांतून उमटल्या.
निंबवडेतील यशस्वी कार्यक्रमानंतर विद्याताई मोटे मुडेवाडी येथे दाखल झाल्या. यावेळी पंचायत समिती गणाचे उमेदवार सचिन मोटे यांचीही उपस्थिती होती. कार्यकर्ते, मतदार आणि ग्रामस्थांनी उत्स्फूर्त स्वागत करत वातावरण भारावून टाकले. विशेष म्हणजे या स्वागतामध्ये महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर दिसून आला.
दिवेलागणीची वेळ असूनही महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्या. विद्याताईंनी महिलांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या, अपेक्षा आणि विकासाविषयीच्या सूचना जाणून घेतल्या. महिला सक्षमीकरण, पाणी, रस्ते, आरोग्य व शिक्षण यांसारख्या मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली. या संवादातून विश्वासाचे आणि सकारात्मकतेचे वातावरण निर्माण झाले.
एकूणच, नावीन्यपूर्ण प्रचार, थेट संवाद आणि लोकांच्या प्रश्नांशी असलेली जवळीक यामुळे निंबवडे व परिसरात विद्याताई मोटे यांचा प्रचार अधिक धारदार, परिणामकारक आणि प्रभावी ठरत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे.

