वडार समाजः पाषाणातून नंदनवन फुलवणारा कष्टाळू समाज!
आयु. विलास खरात
संपादक kd24newz; आटपाडी....समाज रचनेतील जाती व्यवस्थेच्या उतरंडी मध्ये खालच्या स्थरावर असलेला महाराष्ट्रातील वडार समाज हा भटक्या विभुक्त जातीमध्ये समाविष्ठ करणेत आलेला आहे. वडार समाज हा प्रामुख्याने महाराष्ट्र, ओरिसा, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा या राज्यात राहणारा समाज असून तो क्षत्रिय जमात म्हणून ओळखला जातो. ओड, वड्डा, वड्डर, वडार इत्यादी नावाने या जमातीस ओळखले जाते. सदरची नावे हि द्रविड भाषेमधून तयार झाली असावीत त्यामुळे या जमातीचा संबंध नागवंशी द्रविडांशी जुळलेला असावा असे संशोधकांचे मत आहे.
वडार समाजाच्या पारंपारिक धंद्यामुळे त्यांच्या समुहात उपजाती किंवा पोटजाती असलेचे दिसून येते. प्रामुख्याने वडार समाजात जातीचे तीन प्रकार दिसून येतात. १) गाडी वडार : डोंगर किंवा जमिनी मध्ये दगडाच्या खाणी काढून त्यामधून दगड काढणे, त्यास आकार देणे, घराची बांधकामे करणे इत्यादी. २) माती वडर जमिनीत खोदकाम करणे, मातीचे काम, तलाव, बंधारे, कालवे काढणे इत्यादी काम करणारे. ३) पायरवटः- गांवातील वाडे / इमारती / मंदिर बांधकामास दगड घडून बांधकाम करणे, दगड पाषाणातून मूर्ती तयार करणे, वरवंटे, पाटे, उकळ, दळणाचे जाथे इत्यादी काम करणारे हे वडार समाजातील लोक पोट भरणेसाठी काम करीत असत. त्यासाठी ते दणकट, मजबूत, मेहनती व कष्टाळू जमातीचा वर्ग समूह म्हणून ओळखला जातो. पूर्वीच्या कालखंडात गड-किल्ले, गावची तटबंदी, वेस, बुरुज, मंदिरे, राजवाडे, वाडे इमारती इत्यादी बांधकाम करणारा हा समाज होता. पाषाणातून कुशल, अप्रतिम शिल्पकृती घडवून तयार करणारा हा समाज गांवगाड्याच्या बाहेर राहूनही गांव उभारणीच्या कार्यात अत्यंत महत्वपूर्ण योगदान देत असत.
: प्राचीन कालखंडातील स्कंद व विश्वकर्मा पुराणात कारागिरांचे वर्णन आहे. त्यामध्ये भगवान विश्वकर्माचे मनु, मे, त्वष्ठ, शिल्पी व देवग्या या पाच सुपुत्रापैकी केवळ महर्षी शिल्पीचे वंशज किंवा अनुयायी हे वडार समाज असलेचे सांगितलेले जाते. त्याच प्रमाणे वडार समाज हा महर्षी भगीरथाचे व पवनपुत्र हनुमानाचे पूजक मानतात. त्यांची बोलीभाषा ही तेलगु-कानडी मिश्रित बोलली जात असत.
इ.स. १८५७ साली भारतातील संस्थानिक, इनामदार, वतनदार यांनी ब्रिटीश राजवटी विरुध्द बंड पुकारलेले होते. त्यावेळी संस्थानिकांच्या बाजूनी या आदिम जमातींनी उठावात भाग घेतलेला होता. या आदिम जमातींनी इंग्रजावर अनेक हल्ले करून त्यांना परावृत केलेले होते. परंतु इंग्रजांनी सदरचे बंड व हल्ले परास्त केलेले होते. म्हणून या शूर आदिम जमातींना आवर घातला पाहिजे. त्या जमाती धोकादायक ठरू शकतात म्हणून इंग्रजांनी इ.स. १८७१ साली या आदिम जमातीच्या विरुध्द गुन्हेगारी कायदा करून या भटक्या जमातींना गुन्हेगार ठरविण्यात आलेले होते. त्यानंतर भारत देश स्वतंत्र झालेनंतर घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर व पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या सहमतीने इंग्रजाचा गुन्हेगारी कायदा रद्द करणेत येऊन भटक्या जमातींना मुक्त केले, विभुक्त केले. या भटक्या जमातींना ना गांव होते ना जमीन होती. पोट भरणेसाठी भटकंती करून गावोगावी पारंपारिक व्यवसाय करून जगावे लागत होते.
माणदेशातील आटपाडी गावात औंध संस्थानच्या कालखंडात पोटासाठी भटकंती करीत ही धाडसी व ताकतवर जमातीतील काही मंडळी आटपाडी गावात साधारण दोनशे वर्षापूर्वी पासून आलेली आहेत. त्यामध्ये मल्लू वडर हे सातारा नगरीतून आटपाडीच्या परगणात आपल्या परिवारासह आलेले होते. त्यावेळीस मल्लू वडर यांना सात अपत्ये होती. त्यामध्ये सोमा, नामा, रामा, लक्ष्मण, गोजराबाई, श्रीपती व गंगाराम असा कुटुंब कबिला घेऊन आलेले होते. त्यावेळी औंध संस्थानने त्यांना गावच्या माळरानावर म्हणजे शुक्र ओढ्याच्या उत्तर बाजूस असणाऱ्या जागेत राहणेची परवानगी दिलेली होती. त्यानंतर
जागेची साफसफाई करून गवती छप्परे व पाले घालून आपल्या परिवारासह राहू लागले. त्यानंतर इतर गावातून सुध्दा वडार समाजातील मंडळी येऊन राहू लागलेली होती.
आटपाडी येथे वडर समाज स्थायिक झालेनंतर आपला पारंपारिक व्यवसाय करू लागलेले होते. त्यांनी संस्थानची परवानगी गावच्या पाटील-कुलकर्णी यांच्या कडून घेऊन दगड खाणीसाठी डबई कुरण, आटपाडी-शेटफळे रोडवरील खंवणीतील जागा, व चुणवळ येथील जागा दगड खाणीसाठी घेऊन दगड काढणेचा व्यवसाय करू लागलेले होते आटपाडी गावातील वाडे, इमारती, माळवदी घरे यासाठी लागणारा दगड, शिळा दगडी खांब फाडी, दगडी लग, कपऱ्या, घडीव दगड इत्यादी बैलगाडी किंवा रेड्याच्या गाडीत करंजाचापाला, करंजाच्याफोका टाकून त्यामध्ये दगडी भरून गाडी आटपाडीकडे पाठवीत असत. त्यामुळे आटपाडी गावात अनेक वास्तू उभ्या राहिलेल्या आहेत. त्याच बरोबर दगडी उकळ, वरवंटा, दगडी पाटा, दळणाचे दगडी जाथे, उकळ इत्यादी तयार करून देत असत. वडार समाज हा पहाटे लवकर उठून दगडी खाणीवर दगड पाडणेसाठी जात असत. त्यांच्या सोबत लोखंडी हत्यारे सुध्दा असत. त्यामध्ये खोरे, टिकाव, लोखंडी किंवा करंजाच्या फोकाची पाटी, लोखंडी लांब पारा, लोखंडी घण, हातोडी, सुतकी व पारा छन्नी इत्यादी सामान असत. विहिरीच्या दगडी कड्याचे सुद्धा बांधकाम करीत असत. येणाऱ्या मजुरीतून आटपाडी गावच्या आठवडी बाजारातून भाजीपाला व दुकानचे किराणा सामान घेऊन कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित असत व जगण्यासाठी व्यवसाय करावा लागत असलेमुळे शिक्षणाकडे दुर्लक्षित होत होते.
आटपाडीच्या वडर समाजाचे कुळ हे कुंचाफोर आहे. कुळ गोत्रामध्ये वडार समाजातील शिवगणात ३८ आणि गंगा गणात ३८ अशा प्रकारे एकूण ७६ गोत्रे आहेत. पूर्वी वडार समाजात एकत्रित कुटुंब पध्दती होती. औद्योगिकरणामुळे शहरीकरण वाढले. त्यामुळे कुटुंब पद्धतीत बदल होऊ लागलेले आहेत. साधारण गावगाड्यात वडर समाज प्रस्थापित होऊ लागल्यानंतर स्थानिक क्षत्रिय कुळातील आडनावे स्वीकारू लागलेले होते. त्यामुळे वडार समाजात चव्हाण, पवार, चौगुले, शिंदे, जाधव, गायकवाड, थोरात,
मोहिते, माने अशी आडनावे दिसून येतात. वडर समाजातील पुरुष मंडळी ही धोतर, फेटा, टोपी, पायजमा, सदरा, बंडी, कोयरी वापरत असत. खांद्यावर मोठा रुमाल वापरत असे. पायात कातडी पायतान घालत असत. महिला नऊवारी साडी घालत असत.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक विचारधारेनुसार शिका, शिकवा, संघर्ष करा या तत्व प्रणालीनुसार आटपाडी येथील वडर समाज सामाजिक प्रवाहात येऊन शिक्षण घेऊ लागलेले होते. समाजात परिवर्तनाचे विचार सुरु झालेले होते. त्यामुळे आटपाडी येथील वडार समाजातील शंकर सोमा चव्हाण यांनी दगड फोड, बांधकाम व वराह व्यवसाय करून आपल्या मुलांना शिक्षण देऊन डॉक्टर व इंजिनिअर म्हणून घडविले आहे. शंकर चव्हाण यांनी साधारण सन १९३५-३८ सालच्या दरम्यान आटपाडी भागात २५ एकर जमीन माळरानावरील खरेदी केलेली आहे. सन १९४० साली आटपाडी येथे दोन मजली घडीव दगडी चुन्यातील बांधकाम केलेली इमारत १८ खणी बांधलेली आहे. सदर इमारतीस दगड व लाकूड हे डबई कुरणातून आणलेले होते. सदरचे बांधकाम शंकर चव्हाण व केरू चव्हाण यांनी केलेले आहे. त्यानंतर दोन्ही भावांनी मिळून श्री सोनार सिध्द मंदिराचे बांधकाम केले व सन १९४१-१९४२ साली श्री भवानी विद्यालयाची दगडी इमारतीचे बांधकाम केलेली आहेत.
आटपाडी येथील वडर समाजातील डॉ. मनोहर शंकर चव्हाण त्यांची पत्नी व दोन मुले डॉक्टर आहेत. तसेच इंजिनिअर श्री. बाबूराव शंकर चव्हाण व अविनाश शंकर चव्हाण हे रिटायर्ड इंजिनिअर आहेत. तसेच रंजित भिमराव चव्हाण हे इंजिनिअर म्हणून कार्यरत आहेत. प्राथमिक शिक्षक म्हणून शिवाजीराव चव्हाण, आण्णासाहेब रामा चव्हाण, दत्तु केरू चव्हाण तसेच शासनाच्या कृषी विभागात विलास भिमराव चव्हाण, बँक ऑफ इंडियामध्ये सुखदेव भिमराव चव्हाण, हायस्कूलमध्ये गंगाराम खुशाबा चव्हाण, एस.टी. विभागात उत्तम मारुती चव्हाण अशोक नागू चव्हाण, माणिक नागू चव्हाण यांनी सेवा बजाविली आहे. पोलीस विभागात विकास व अनिल चव्हाण तसेच भारतीय सैन्य दलात सोमनाथ अशोक चव्हाण, प्रभाकर सुखदेव चव्हाण तसेच आश्लेषा अरुण चव्हाण या मुंबई पोलीस दलात कार्यरत आहेत. शिक्षणामुळे समाजात बदल
दिसू लागलेले आहेत. सामाजिक परिवर्तन हे समाजात हळूहळू होऊ लागलेले आहे. परंतु अंधश्रद्धा व व्यसन हे समाजासाठी गतिरोधक ठरत तर नाहीत ना? यांचा विचार होणे गरजेचे आहे.
आटपाडीतील वडर समाज हा सर्व सण-सुद साजरे करतात. कुलदैवत म्हणून श्री बालाजीस मानतात आटपाडी येथे श्री बालाजीचे मंदिर स्थापन केलेले आहे. दर तीन वर्षांनी श्री बालाजीची यात्रा करतात. त्याच प्रमाणे श्री यल्लमा देवी, श्री लक्ष्मी देवी, श्री मरिमाता, श्री अंगणलक्ष्मी, श्री इठलाई, श्री साती आसरा, श्री दुर्गामाता, श्री संकलाम्मा, म्हसोबा इत्यादी देवी देवतांची पूजाअर्चा करतात. त्याचप्रमाणे आलीकडे गणेशोत्सव साजरा करतात. आटपाडी (प्रकाशवाडी) येथील वडार समाजातील कुटुंब प्रमुखाची नावे :- सुभाष शंकर चव्हाण, विनायक कानाप्पा चव्हाण, भानुदास रामचंद्र चव्हाण, उत्तम मारुती चव्हाण, सुखदेव भिमराव चव्हाण, रविंद्र गोरख चव्हाण, बाळू रामा चव्हाण, गंगाराम खुशाबा चव्हाण, अरुण अर्जुन चव्हाण, गंगाराम यशवंत चव्हाण, अरुण तानाजी चव्हाण, शिवाजी धोंडीबा चव्हाण, सुखदेव किसन चव्हाण, राम तायाप्पा चव्हाण, विठ्ठल हणमंत चव्हाण, गुलाब वामन चव्हाण, गुलाब महादेव चव्हाण, शशिकांत शिवाजी चव्हाण, जयवंत रामु माने, योगेद्र तुकाराम नांगरे, शंकर महादेव शिंदे, विठ्ठल नाना जाधव, रमेश दत्तात्रेय चव्हाण हे आपल्या कुटुंबासह आटपाडी येथे वास्तव्यास आहेत.
त्याच प्रमाणे कर्नाटक राज्यातून सन १९७२ सालच्या दुष्काळात आटपाडी तलावाच्या कामासाठी श्री. कुंडलिक (नाना)पाटील उर्फ के.डी.पाटील क्रॉट्रक्टदार आटपाडी यांनी दुष्काळी कामासाठी कर्नाटकातून वडर समाजातील मजूर आणलेले होते. त्यामध्ये तमन्ना तायाप्पा पवार, हणमंत जाधव, रामाण्णा जाधव, फुलाप्पा जाधव, फुलाजी साळुंखे, हणमंत चव्हाण, हणमंत जमखंडे येलाप्पा शिल्पी इत्यादी वडार समाजातील कुटुंबे आणलेली होती. त्यावेळी आटपाडी तलावाची कामे, रस्ते व बांधकामे हि कामे रोजगार हमीतून करणेत येत असत. काही कालावधी नंतर हणमंत जाधव व नागाप्पा पवार यांनी बांधकाम व्यवसायासाठी रजिस्ट्रेशन करून घेतले व समाजाला सोबत घेऊन व्यवसाय धंदा करू
लागलेले होते. आपल्या कष्टातून घाम गाळून आटपाडीमध्ये अनेक वर्षे कामे केली. त्यामुळे ते आटपाडीतच स्थायिक झाले व पोट भरू लागले. व आटपाडीच्या (विठ्ठलनगर) माळ रानामध्ये घरासाठी जागा विकत घेऊन घरे बांधली. जमिनी घेतल्या व आपल्या मुलांना योग्य प्रकारे शिक्षण दिले. शिक्षणामुळे प्रगती करू लागलेले होते. आचार-विचारात परिवर्तन होऊ लागलेले होते. शिक्षणामुळे अर्जुन नागाप्पा पवार हे आटपाडीचे मुंबई येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक या पदावर काम करतात. तसेच भिमराव नागाप्पा पवार हे पुणे येथे पत्रकारिता करीत कायद्याचे शिक्षण घेऊन वकिली व्यवसाय करतात. रामचंद्र हणमंत जाधव हे श्री भवानी विद्यालय आटपाडी येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. लक्ष्मी रामण्णा पवार हि कन्या मुंबई पोलीस दलात कार्यरत आहे. तसेच एस.टी. आगारात ड्रायव्हर म्हणून लक्ष्मण हणमंत चव्हाण हे काम करतात. तसेच पैलवान म्हणून मारुती शिवाजी जाधव यांनी कुस्ती क्षेत्रात महाराष्ट्रभर नाव केलेले आहे त्याच प्रमाणे शिक्षण क्षेत्राकडे थोडे बहुत विद्यार्थी जावू लागलेले आहेत.
आटपाडी येथील वडर समाजातील (विठ्ठलवाडी) लोक हे श्री बालाजी, श्री दुर्गादेवी, श्री इरनागामा, श्री हनुमान, श्री मरिमाता, श्री येल्लाम्मा देवी, श्री म्हसोबा इत्यादी देवी देवतांची पूजा अर्चा करतात. तसेच कर्नाटकात जाऊन कुलदैवतांच्या व इतर देवी देवतांचे पूजन करून येतात. आटपाडी येथे दुर्गादेवीचे मंदिर बांधलेले आहे. अशा या वडर समाजातील सध्याचा व्यवसाय हा गवंडी काम, सेट्रींग काम, सरकारे कामे बांधकाम, रस्ते, दगड क्रेशर, शेती करून उदरनिर्वाह करतात. आटपाडी येथील (विठ्ठलवाडी) वडार समाजातील कुटुंब प्रमुख खालीलप्रमाणे आहेत. नागाप्पा तमन्ना पवार, हणमंत रामण्णा जाधव, हणमंत भीमशी कुऱ्हाडे, हणमंत तिमन्ना चव्हाण, लक्ष्मण तमन्ना पवार, रामण्णा तमन्ना पवार, फुले आप्पा तिमन्ना जाधव, रामण्णा तिमन्ना जाधव, फुलाजी तिमन्ना साळुंखे, लक्ष्मण येलाप्पा शिल्पी, हणमंत दुर्गाप्पा जमखंडे, गोविंद दुर्गाप्पा जमखंडे, हणमंत येलाप्पा शिल्पी, रामण्णा येलाप्पा शिल्पी, हुलगाप्पा येलाप्पा दांडेकर, शिवाजी हणमंत जाधव, ज्ञानु हणमंत जाधव सिद्राम दुर्गाप्पा पवार, तिमन्ना हणमंत
चव्हाण, तिमन्ना व्यंकाप्पा पवार, रामण्णा हणमंत चव्हाण, व्यंकटेश रामण्णा जाधव, शिवाजी फुलेआप्पा जाधव हि कुटुंबे आटपाडी येथे सध्या वास्तव्यास आहेत.
औद्योगिकरण, शिक्षण, सामाजिक चळवळीमुळे दगड फोड इत्यादी व्यवसाय करणारा हा वडर समाज आता गावोगावी स्थायिक झालेला आहे. वडार समाज हा सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, यवतमाळ, नंदुरबार, धाराशिव, पुणे, ठाणे, नांदेड, बीड, लातूर व जालना इत्यादी जिल्ह्यात सदर समाजाची लोकसंख्या दिसून येते. सदरचा समाज हा अत्यंत प्रामणिक कष्टाळू मेहनती व कलासक्त असणारा हा वर्ग अजूनही उपेक्षितच वाटतो. हा समाज संघटीत दिसून येत नाही. प्रबोधनाच्या चळवळी समाजात होणे गरजेचे आहे. शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ होणे अत्यंत गरजेचे आहे. शिक्षणाशिवाय या समाजाची प्रगती होणार नाही. त्यासाठी वडार समाजासाठी निवासी आश्रम शाळा उभारणे गरजेचे आहे. वडार समाजाच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व सांस्कृतिक प्रगतीसाठी सर्वांनी योगदान देणे अत्यंत महत्वाचे आहे.
संपादक kd24newz :सुधीर पाटील
संदर्भ :-
१) भटका विभुक्त वडार समाज आणि संस्कृती ले. विजया लक्ष्मी देवगोजी
२) स्कंद पुराण
सहकार्य :-
१) सुभाष शंकर चव्हाण
२) गंगाराम खुशाबा चव्हाण
३) उत्तम मारुती चव्हाण
४) येलाप्पा नागाप्पा पवार
लेखक
आयुः विलास खरात आटपाडी, जि. सांगली
मो.नं. ९२८४०७३२७७
