Sanvad News मतदानाच्या तोंडावर पिंपरी खुर्दमध्ये भाजपची मोठी मुसंडी ; शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते व माजी डेप्युटी सरपंचांचा जाहीर प्रवेश

मतदानाच्या तोंडावर पिंपरी खुर्दमध्ये भाजपची मोठी मुसंडी ; शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते व माजी डेप्युटी सरपंचांचा जाहीर प्रवेश

Admin

 मतदानाच्या तोंडावर पिंपरी खुर्दमध्ये भाजपची मोठी मुसंडी ; शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते व माजी डेप्युटी सरपंचांचा जाहीर प्रवेश


आटपाडी  :जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी अवघे काही दिवस उरले असतानाच पिंपरी खुर्द (ता. आटपाडी) येथे झालेल्या महत्त्वाच्या राजकीय घडामोडीमुळे संपूर्ण तालुक्याचे लक्ष वेधले गेले आहे. शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते तसेच गावातील प्रभावी पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केल्याने स्थानिक राजकारणाला निर्णायक वळण मिळाले असून, या प्रवेशामुळे भाजपची ताकद लक्षणीयरीत्या वाढली आहे.

शिवसेनेचे अनिल शंकर रूपटके (डेप्युटी सरपंच) आणि रावसाहेब ज्ञानू मंडले (माजी डेप्युटी सरपंच) यांच्यासह अनेक अनुभवी व सक्रिय कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. हा पक्षप्रवेश आटपाडी नगरपंचायतीचे नगराध्यक्ष यु. टी. जाधव, करगणी जिल्हा परिषद गटाचे अधिकृत उमेदवार दादासाहेब हुबाले, निंबवडे गणातील पंचायत समितीचे अधिकृत उमेदवार जयवंत सरगर तसेच माडगूळ गणातील पंचायत समितीचे भाजपचे अधिकृत उमेदवार दादासाहेब मोटे सर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

या वेळी विष्णू अर्जुन, कैलास यमगर, अनिल सूर्यवंशी, विजय मेटकरी, सचिन डिगोळे, अमोल सरगर, नवनाथ सरगर, दत्ता जेडगे, अनिल हाके, राहुल अनुशे, राजू पुजारी, दत्ता शेजाळ, बंडू हाके आदी कार्यकर्त्यांनीही भाजपमध्ये प्रवेश करत पक्षाच्या विकासाभिमुख धोरणावर आपला विश्वास व्यक्त केला.

पिंपरी खुर्द गावामध्ये भाजपकडून करण्यात आलेली रस्ते, पाणीपुरवठा, वीज, स्वच्छता तसेच इतर मूलभूत सुविधांची कामे, पारदर्शक कारभार आणि सातत्यपूर्ण लोकसंपर्क यामुळे भाजपबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. प्रामाणिक व कार्यक्षम नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या दादासाहेब मोटे यांच्या विजयासाठी एकदिलाने भाजपमध्ये प्रवेश केल्याचे प्रवेशकर्त्यांनी सांगितले.

महत्त्वाचे म्हणजे मतदानाच्या अगदी तोंडावर हा पक्षप्रवेश झाल्याने शिवसेना गटामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. पिंपरी खुर्दमध्ये शिवसेनेचे पारंपरिक मतदार व कार्यकर्ते भाजपकडे वळल्याने निवडणूक गणिते बदलण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. या घडामोडीमुळे शिवसेना गटाला आपली रणनीती पुन्हा आखावी लागणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

या पक्षप्रवेशामुळे भाजपचे संघटन अधिक मजबूत झाले असून, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजप अधिक आत्मविश्वासाने आणि आक्रमकपणे मैदानात उतरत असल्याचा स्पष्ट संदेश या राजकीय घडामोडीतून मिळतो. अनुभवी नेतृत्व, वाढती कार्यकर्त्यांची ताकद आणि विकासाच्या मुद्द्यांवर आधारित प्रचार यामुळे भाजपची वाटचाल निर्णायक ठरणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.

पिंपरी खुर्दसह परिसरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून, येणाऱ्या निवडणुकीत या पक्षप्रवेशाचा मोठा प्रभाव दिसून येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

To Top