आटपाडीत पोलिसांची धडक कारवाई! अवैध हातभट्टी उद्ध्वस्त
चिचघाट–काळेवाडी हद्दीत छापा; 31 हजारांची गावठी दारू जप्त, आरोपीवर गुन्हा दाखल
आटपाडी (kd24newz ) : आटपाडी तालुक्यातील चिचघाट–काळेवाडी परिसरात अवैधरित्या गावठी हातभट्टी लावून दारू निर्मिती करणाऱ्यांवर पोलिसांनी धडक कारवाई करत संपूर्ण भट्टी उद्ध्वस्त केली. या कारवाईमुळे बेकायदेशीर दारू व्यवसाय करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
मा. पोलीस अधीक्षक संदीप घुगे, मा. अतिरिक्त पोलीस अधीक्षक बारवकर तसेच मा. उपविभागीय पोलिस अधिकारी विपुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. प्रभारी अधिकारी विनय बहिर यांच्या सूचनेनुसार ओपी करगणीचे पोलीस उपनिरीक्षक आर. एम. केंद्रे व त्यांच्या पथकाने ही मोहीम राबवली.
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे चिचघाट व काळेवाडी गावांच्या हद्दीत छापा टाकण्यात आला. यावेळी आरोपी शंकर बबन हा गावठी हातभट्टी लावून बेकायदेशीर दारू निर्मिती करत असल्याचे उघड झाले. पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकत अंदाजे 31,802 रुपयांची हातभट्टी साहित्य जप्त करून ती जागीच नष्ट केली.
या कारवाईत पोहेकॉ/गावडे, पोहेकॉ/गवंड व पोहेकॉ/2055 बोडके यांनी सक्रिय सहभाग घेतला. आरोपीविरुद्ध संबंधित कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, जिल्हा पोलीस दलाकडून अवैध दारू निर्मिती व विक्रीविरोधात सातत्याने मोहीम राबवली जात असून, अशा बेकायदेशीर कृत्यांना कोणतीही सूट दिली जाणार नाही, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. नागरिकांनीही अशा प्रकारांची माहिती तात्काळ पोलिसांना देऊन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
