खोट्या आरोपांविरोधात कळंबोलीत जनआक्रोश ! सचिन मोटे,राहुलदादा हजारे समर्थकांची एकजूट; दुग्धाभिषेक आंदोलनातून समाजकंटकांना कडक इशारा!
आटपाडी kd24newz ; नवी मुंबईतील कळंबोली परिसरात मा. आयकर उपायुक्त श्री. सचिन मोटे आणि DDSR Group चे व्यवस्थापकीय संचालक मा. श्री राहुलदादा हजारे यांच्याविरुद्ध काही समाजकंटकांनी कोणतेही ठोस पुरावे नसताना बिनबुडाचे, खोटे व दिशाभूल करणारे आरोप केल्याने संतापाची लाट उसळली आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज भव्य आंदोलन उभारण्यात आले.
विश्वास, पारदर्शकता आणि प्रामाणिकतेच्या बळावर रिअल इस्टेट क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या DDSR ग्रुप सारख्या प्रतिष्ठित संस्थेचे नाव जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप उपस्थितांनी केला. “ही केवळ व्यक्तींवर नव्हे, तर समाजाच्या विश्वासावर केलेली घाला आहे,” अशी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली.
या निषेधार्थ आज कळंबोलीत मोठ्या प्रमाणावर समाजबांधव एकत्र येत सचिन मोटे व राहुलदादा हजारे यांच्या प्रतिमेचा दुग्धाभिषेक करून जाहीर निषेध नोंदवण्यात आला. घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला असून, “खोट्या आरोपांचा निषेध असो”, “सत्याचा विजय असो” अशा घोषणांनी वातावरण भारावून गेले.
याप्रसंगी मुंबईसह विविध भागांतून आलेले राहुलदादा हजारे व सचिन मोटे यांचे समर्थक, प्रेमी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. युवक, व्यावसायिक, सामाजिक कार्यकर्ते तसेच ज्येष्ठ नागरिकांनीही मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत एकजुटीचे दर्शन घडवले. अनेकांनी आपल्या भावना व्यक्त करत, “प्रामाणिक माणसांवर अन्याय सहन केला जाणार नाही,” असा इशारा दिला.
स्थानिक नागरिकांनी सांगितले की, हजारो कुटुंबांच्या घराच्या स्वप्नाशी निगडित असलेल्या अशा व्यक्तींवर हेतुपुरस्सर खोटे आरोप करणे अत्यंत निंदनीय आहे. यामुळे समाजात चुकीचा संदेश जात असून, अशा समाजकंटकांविरोधात तात्काळ व कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी ठाम मागणी करण्यात आली.
जनतेची ठाम भूमिका खोटारड्यांना आता कायद्याचा धाक दाखवण्याची वेळ असल्याचे बोलण्यात आले!
दरम्यान, समर्थकांनी एकमुखाने सांगितले की, “सत्य कधीही झाकले जात नाही. सचिन मोटे आणि राहुलदादा हजारे यांच्या प्रामाणिक कार्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. अशा खोट्या आरोपांनी त्यांच्या प्रतिमेला धक्का बसणार नाही, उलट जनतेचा पाठिंबा अधिक भक्कम होईल.”
