बनपुरीत थरकाप उडवणारी घटना : चोरीच्या संशयातून बापाचा पोटच्या मुलींवर अमानुष अत्याचार; एका चिमुकलीचा मृत्यू!
रात्रीभर हातपाय बांधून टांगून ठेवले; सकाळी एकीचा मृत्यू, दुसरी गंभीर, आटपाडी तालुक्यात संतापाची लाट
आटपाडी kd24newz : तालुक्यातील बनपुरी येथे माणुसकीला काळिमा फासणारी, हृदय पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. चोरीच्या संशयातून स्वतःच्या पोटच्या दोन मुलींनाच अमानुष शिक्षा देणाऱ्या बापाच्या क्रूर कृत्यामुळे वय ०९ वर्षीय ऋतुजा दादू यमगर हिचा मृत्यू झाला असून, तिची बहीण अनुजा दादू यमगर ही गंभीर अवस्थेत उपचार घेत आहे. या घटनेने संपूर्ण आटपाडी तालुका हादरला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बनपुरी येथील ऋतुजा (वय ०९) आणि अनुजा (वय १०) या दोन बहिणींवर यामगर वस्तीवर चोरी केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. ही बाब त्यांच्या आई-वडिलांच्या कानावर गेल्यानंतर मुलींना विचारणा करण्यात आली. यावेळी मुलींनी चोरी केल्याची कबुली दिल्याचे सांगितले जाते.
या प्रकारामुळे संतप्त झालेल्या वडील दादू यमगर यांनी संतापाच्या भरात माणुसकी विसरून थेट अमानुष मार्ग अवलंबला. २५ मार्च रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास त्यांनी दोन्ही मुलींचे हातपाय बांधून त्यांना रात्रभर टांगून ठेवले. या क्रूर आणि निर्दयी शिक्षेमुळे दोन्ही चिमुकल्यांची प्रकृती झपाट्याने खालावली.
२६ मार्च रोजी सकाळी सुमारे ६ वाजता आजोबांनी मुलींना सोडवले असता त्या बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्या. त्यामध्ये ऋतुजा हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले, तर अनुजा हिला तातडीने उपचारासाठी आटपाडी येथील वरद हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान,अनुजाने डॉक्टरांना दिलेल्या जबाबातून या अमानुष प्रकाराचा पर्दाफाश झाला. वडिलांनी हातपाय बांधून रात्रभर टांगून ठेवल्याची आणि बहिणीचा मृत्यू झाल्याची माहिती तिने दिल्यानंतर संपूर्ण प्रकरण उघडकीस आले.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने धाव घेत ऋतुजाचा मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी आटपाडी ग्रामीण रुग्णालयात पाठविला.
या घटनेमुळे बनपुरीसह संपूर्ण आटपाडी तालुक्यात संतापाची तीव्र लाट उसळली आहे. “ज्यांनी संरक्षण द्यायचं, त्याच बापाकडून असा निर्दयी अत्याचार होणं ही समाजासाठी लज्जास्पद बाब आहे,” अशा तीव्र भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
आटपाडी पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे.
