Sanvad News निंबवडेत चारित्र्याच्या संशयातून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या!

निंबवडेत चारित्र्याच्या संशयातून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या!

Admin

 निंबवडेत चारित्र्याच्या संशयातून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या

 गुरुवारी रात्रीची संतापजनक घटना; आरोपी पती अटकेत;वारंवार होणाऱ्या कौटुंबिक वादाचा झाला भीषण शेवट; नातेवाईकांसमोरच घडली थरारक घटना


आटपाडी kd24newz ; ता. २० : आटपाडी तालुक्यातील निंबवडे येथे चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीची लाकडी दांडक्याने मारहाण करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (ता. १९ मार्च) रात्री घडली. मंगल अंकुश वाघमारे असे मृत महिलेचे नाव असून, याप्रकरणी आरोपी पती अंकुश बाळू वाघमारे याला पोलिसांनी अटक केली आहे.

    याबाबत अधिक माहिती अशी की, निंबवडे गावाजवळील ओढ्यालगत रामचंद्र म्हाकू मोटे यांच्या शेतात फिर्यादी व त्यांचे कुटुंब वास्तव्यास आहे. त्याच परिसरात काही अंतरावर मंगल वाघमारे ही पतीसह झोपडी करून राहत होती. संबंधित कुटुंब बाभळीची झाडे तोडून कोळसा तयार करण्याचा व्यवसाय करत असून ते परगावाहून येथे वास्तव्यास आले आहेत.

     मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी पती अंकुश वाघमारे हा गेल्या काही दिवसांपासून पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. यावरून दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. गुरुवारी सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारासही त्यांच्यात जोरदार भांडण झाले होते. त्यावेळी नातेवाईकांनी मध्यस्थी करून वाद मिटवला होता.

    मात्र, रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास पुन्हा वाद उफाळून आला. यावेळी मंगल हिच्या ओरडण्याचा आवाज ऐकून तिचा भाऊ, वहिनी व इतर नातेवाईक झोपडीकडे धावले असता, आरोपी अंकुश हा मंगल हिला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करत असल्याचे दिसून आले. नातेवाईकांना पाहताच आरोपी घटनास्थळावरून पसार झाला.

     या मारहाणीत मंगल हिच्या डोक्यावर व कपाळावर गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. ती जागीच निपचित पडली होती. नातेवाईकांनी तातडीने तिला निंबवडे येथे आणून रुग्णवाहिकेच्या मदतीने उपचारासाठी नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती तिला मृत घोषित केले.

    घटनेची माहिती मिळताच निंबवडेचे पोलीस पाटील व आटपाडी पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी आटपाडी येथील शासकीय रुग्णालयात पाठवला आहे.

     या प्रकरणी मृत महिलेच्या भावाने आटपाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, पोलिसांनी गुन्हा नोंद करून आरोपी अंकुश बाळू वाघमारे याला अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.

To Top