Sanvad News गॅसअभावी आटपाडीतील हॉटेल व्यवसाय ठप्प होण्याच्या मार्गावर!

गॅसअभावी आटपाडीतील हॉटेल व्यवसाय ठप्प होण्याच्या मार्गावर!

Admin

 गॅसअभावी आटपाडीतील हॉटेल व्यवसाय ठप्प होण्याच्या मार्गावर! 

 “घरगुती गॅस मिळतोय, मग व्यवसायिकांना का नाही?” संतप्त व्यापाऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन!


आटपाडी प्रतिनिधी : आटपाडी येथील हॉटेल व्यवसायिक संघटनेच्या वतीने व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या तीव्र टंचाईविरोधात तहसीलदारांकडे निवेदन देत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. आटपाडीतील हॉटेल, नाष्टा सेंटर, खानावळ, चायनीज सेंटर, ढाबे तसेच वडापाव गाडेधारक यांचा व्यवसाय सध्या गॅसअभावी अक्षरशः बंद पडण्याच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे.

    निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, शासनाकडून व्यावसायिक गॅस सिलेंडरचा ५० टक्के कोटा उपलब्ध करून देण्यात आलेला असतानाही आटपाडीमध्ये अद्याप एकही सिलेंडर उपलब्ध झालेला नाही. यामुळे स्थानिक लहान-मोठ्या व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून त्यांच्या उदरनिर्वाहावर गंभीर संकट निर्माण झाले आहे.

     यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या व्यावसायिकांनी संतप्त प्रतिक्रिया देताना सांगितले की, “पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅस नियमितपणे मिळत असताना फक्त व्यावसायिक गॅसच का मिळत नाही, हा मोठा प्रश्न आहे.” अनेकांनी सांगितले की, यापूर्वी आठवड्याला चार सिलेंडर मिळत होते, परंतु सध्या एकही सिलेंडर उपलब्ध नसल्याने व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे. किमान आठवड्याला दोन सिलेंडर मिळाले तरी व्यवसाय सुरळीत चालू राहू शकतो, अशी मागणी त्यांनी केली.

     तहसीलदारांकडे दिलेल्या निवेदनात पुरवठा शाखा व संबंधित गॅस एजन्सींना तात्काळ सूचना देऊन सिलेंडर उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच सिलेंडर वितरणामध्ये पारदर्शकता राखावी आणि सर्व पात्र व्यावसायिकांना न्याय मिळावा, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.

      या प्रश्नाकडे प्रशासनाने तातडीने लक्ष न दिल्यास येणाऱ्या काळात आंदोलनाचा इशारा देखील हॉटेल व्यवसायिक संघटनेने दिला आहे.

To Top