आटपाडीत अतिक्रमणांविरोधात ‘ऑपरेशन बुलडोझर’ बाजारपटांगण ते सांगोला चौक ‘टार्गेट’!
आज तहसील कार्यालयात अतिक्रमणधारकांची निर्णायक बैठक; उद्यापासून बुलडोझर कारवाईचे संकेत!
आटपाडी kd24newz :आटपाडी नगरपंचायत प्रशासनाने शहरातील वाढत्या अतिक्रमणांविरोधात अखेर कठोर पवित्रा घेतला असून मंगळवार दि. 19 मे 2026 पासून शहरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. बाजारपटांगण परिसर, शुक्र ओढालगतचा भाग, ब्राम्हण घाट मार्ग, अंबाबाई मंदिर रस्ता तसेच सांगोला चौकापर्यंतच्या अतिक्रमणांवर बुलडोझर चालण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर आज सोमवार दि. 18 मे रोजी तहसील कार्यालयात अतिक्रमणधारकांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली असून प्रशासनाचा इशारा लक्षात घेता व्यापाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
आटपाडी शहरातील आठवडी बाजार हा तालुक्यातील प्रमुख बाजार म्हणून ओळखला जातो. दर शनिवारी तालुक्यासह बाहेरील भागातून शेतकरी, व्यापारी आणि नागरिक मोठ्या संख्येने बाजारासाठी येत असतात. मात्र बाजारासाठी जागा अपुरी पडत असल्याने अनेक व्यापाऱ्यांनी शुक्र ओढालगतच्या ब्राम्हण घाट रस्त्यावरच ठिय्या मांडल्याने वाहतुकीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी रस्ते अरुंद झाले असून नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या.
याशिवाय बाजारपटांगण ते सांगोला चौक या मुख्य मार्गालगत ओढ्याच्या कडेला मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे वाढली आहेत. काही ठिकाणी नगरपंचायत मालकीच्या जागांवरही अतिक्रमण झाल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे नगरपंचायत कौन्सिलच्या दि. 20 मार्च 2026 रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत अतिक्रमण हटविण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता. त्या ठरावाची अंमलबजावणी करण्यासाठी आता प्रशासनाने प्रत्यक्ष मोहीमेची तयारी पूर्ण केली आहे.
नगरपंचायत प्रशासनाकडून संबंधित अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या असून स्वतःहून अतिक्रमण हटविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अन्यथा प्रशासनाच्या कारवाईला सामोरे जावे लागेल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. विशेष म्हणजे शुक्र ओढ्याच्या दक्षिण भागातील ब्राम्हण घाट रस्ता, अंबाबाई मंदिर मार्ग आणि सांगोला चौकापर्यंतचा परिसर प्रशासनाच्या रडारवर असल्याने उद्यापासून मोठी कारवाई होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
दरम्यान, आज दुपारी 4 वाजता तहसील कार्यालय, आटपाडी येथे अतिक्रमणधारकांची बैठक होणार असून प्रशासनाची भूमिका काय राहणार याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. अतिक्रमण हटविण्याच्या निर्णयामुळे शहरातील राजकीय, व्यापारी आणि सामाजिक वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
