खरीप २०२६ साठी आटपाडी तालुक्यात विविध योजनांचा शुभारंभ
बाजरी, मका, सोयाबीन, भुईमूग व सूर्यफूल पिकांसाठी प्रात्यक्षिके आणि प्रमाणित बियाणे वितरण; शेतकऱ्यांना ३१ मेपर्यंत अर्जाचे आवाहन
आटपाडी kd24newz : राष्ट्रीय अन्नसुरक्षा व पोषण अभियान अन्नधान्य पिके तसेच राष्ट्रीय खाद्यतेल अभियान तेलबिया योजनेंतर्गत खरीप हंगाम २०२६ साठी आटपाडी तालुक्यात विविध पिकांच्या प्रात्यक्षिके व प्रमाणित बियाणे वितरणासाठी मोठा लक्षांक प्राप्त झाला असून, इच्छुक शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर ३१ मे २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी, आटपाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
या योजनेंतर्गत मका, बाजरी, सोयाबीन, भुईमूग आणि सूर्यफूल या पिकांसाठी सुधारित पीक प्रात्यक्षिके, मूल्य साखळी समूह (VCD) तसेच प्रमाणित बियाणे वितरणाचा लाभ देण्यात येणार आहे. कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान, सुधारित वाण आणि उत्पादनवाढीच्या दृष्टीने ही योजना महत्त्वाची ठरणार आहे.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा व पोषण अभियानांतर्गत मका पिकासाठी ७ गटांची निवड करण्यात येणार असून ७० हेक्टर क्षेत्रावर प्रात्यक्षिके राबविण्यात येतील. यामध्ये १७५ लाभार्थींना १०.५० क्विंटल बियाण्यांचे वितरण होणार आहे. तसेच वैयक्तिक शेतकरी घटकांतर्गत बाजरी पिकासाठी १६०० हेक्टर क्षेत्रासाठी ४००० लाभार्थींना ६४ क्विंटल प्रमाणित बियाणे देण्यात येणार आहेत. याशिवाय मका पिकाचे १४ क्विंटल बियाण्यांचाही स्वतंत्र लक्षांक मंजूर झाला आहे.
राष्टीय खाद्यतेल अभियानांतर्गत सोयाबीन पिकासाठी ‘फुले-दुर्वा’ या वाणाचा समावेश करण्यात आला आहे. या अंतर्गत ४ गटांमार्फत ४० हेक्टर क्षेत्रावर प्रात्यक्षिके राबविण्यात येणार असून १०० लाभार्थींना 7.50 क्विंटल बियाण्यांचे वितरण होईल.
राष्ट्रीय खाद्यतेल अभियान तेलबिया योजनेंतर्गत सोयाबीन, भुईमूग व सूर्यफूल पिकांनाही प्राधान्य देण्यात आले आहे. . भुईमूगासाठी ‘केडी-१८१२ (कादरी लेपाक्षी)’ या वाणाची ९० क्विंटल बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार असून १५० लाभार्थींना त्याचा लाभ मिळणार आहे. सूर्यफूलासाठी ‘KBSH-85’ या वाणाचा समावेश असून प्रात्यक्षिकांसाठी ३.५० क्विंटल बियाणे १०० लाभार्थींना देण्यात येणार आहे.
पीक प्रात्यक्षिके घटकासाठी अर्ज करणाऱ्या गटांनी ३१ मार्च २०२६ पूर्वी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान (MSRLM), राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान (NRLM), महिला आर्थिक विकास महामंडळ (MAVIM) किंवा नाबार्डकडे नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. प्रत्येक गटामध्ये कमाल २५ शेतकरी असावेत व प्रत्येक शेतकऱ्याकडे किमान ०.४० हेक्टर क्षेत्र असणे बंधनकारक आहे.
प्रमाणित बियाणे वितरण या घटकासाठी वैयक्तिक शेतकऱ्यांनाही अर्ज करता येणार असून, प्रती शेतकरी कमाल १ हेक्टरपर्यंत लाभ देय राहील. या योजनेचा लाभ दोन वर्षांतून एकदाच मिळणार आहे.
लाभार्थी निवड ही महाडीबीटी पोर्टलवर “प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य” या तत्त्वावर संगणकीय पद्धतीने करण्यात येणार आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/AgriLogin या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावेत. तसेच Agristack वर शेतकरी नोंदणी व Farmer ID असणे बंधनकारक असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.
या संदर्भातील प्रसिद्धीपत्रक मारुती कौलगे तालुका कृषी अधिकारी कार्यालय, आटपाडी यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आले असून ग्रामपंचायत कृषी वार्ता फलक, सोशल मीडिया, व्हॉट्सअॅप ग्रुप आणि फेसबुकच्या माध्यमातून व्यापक प्रसिद्धी करण्याच्या सूचना कृषी अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
