केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा उद्या सांगली-सातारा-पुणे दौरा
उद्या विश्रामबाग येथे पत्रकार परिषद; साताऱ्यात उदयनराजे भोसले यांची सदिच्छा भेट होणार , पुण्यात अनंतराव थोपटे यांच्या श्रद्धांजली सभेस उपस्थिती राहणार !
सांगली, kd24newz :केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले हे शनिवार, दि. १३ जून रोजी कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे आणि दिल्ली असा अधिकृत दौरा करणार आहेत. या दौऱ्यात ते विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार असून सांगलीतील पत्रकार परिषद, साताऱ्यातील सदिच्छा भेट आणि पुण्यातील श्रद्धांजली सभेला उपस्थित राहणार आहेत.
प्राप्त दौरा कार्यक्रमानुसार, रामदास आठवले हे सकाळी ९.०५ वाजता मुंबई विमानतळावरून स्टार एअरच्या विमानाने कोल्हापूरकडे रवाना होणार असून सकाळी १० वाजता त्यांचे कोल्हापूर विमानतळावर आगमन होईल.
यानंतर ते रस्तेमार्गे सांगली जिल्ह्यातील विश्रामबाग येथे येणार असून आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कार्यालयात दुपारी 11.30 किंवा 12 वा पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत विविध सामाजिक, राजकीय व समकालीन विषयांवर ते भूमिका मांडण्याची शक्यता आहे.
पत्रकार परिषदेनंतर ते साताऱ्याकडे रवाना होणार असून तेथे हॉटेल फर्न येथे आगमनानंतर खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांची जलमंदिर, राजवाडा येथे सदिच्छा भेट घेणार आहेत. या भेटीत विविध राजकीय व सामाजिक विषयांवर चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
त्यानंतर रामदास आठवले पुण्याकडे रवाना होणार असून सायंकाळी ६ वाजता शिवाजीनगर येथील बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित महाराष्ट्र शासनाचे माजी मंत्री स्वर्गीय अनंतराव थोपटे यांच्या श्रद्धांजली सभेस उपस्थित राहणार आहेत.
दिवसभरातील कार्यक्रम पूर्ण केल्यानंतर ते रात्री पुणे विमानतळावरून एअर इंडियाच्या विमानाने दिल्लीकडे प्रयाण करणार असून रात्री १०.५० वाजता दिल्ली विमानतळावर पोहोचतील.
दरम्यान, केंद्रीय मंत्री आठवले यांच्या दौऱ्यादरम्यान त्यांना महाराष्ट्रात लागू असलेली ‘झेड’ दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरविण्याचे निर्देश संबंधित प्रशासनाला देण्यात आले आहेत. तसेच स्वागत, निवास, वातानुकूलित वाहन, सुरक्षा ताफा व इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या दौऱ्यामुळे सांगली, सातारा आणि पुणे जिल्ह्यांतील राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली असून त्यांच्या पत्रकार परिषदेकडे विशेष लक्ष लागले आहे.
