Sanvad News आटपाडीत जुलैमध्ये भव्य 'जनता दरबार'; नगराध्यक्ष यू. टी. जाधव यांची मोठी घोषणा

आटपाडीत जुलैमध्ये भव्य 'जनता दरबार'; नगराध्यक्ष यू. टी. जाधव यांची मोठी घोषणा

Admin

 आटपाडीत जुलैमध्ये भव्य 'जनता दरबार'; नगराध्यक्ष यू. टी. जाधव यांची मोठी घोषणा

निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनाची होणार पूर्तता; गोरगरीब, उपेक्षित व वंचित घटकांना शासनाच्या सर्व योजनांचा लाभ मिळवून देण्याचा निर्धार

आटपाडी kd24news; आटपाडी शहरातील गोरगरीब, उपेक्षित व वंचित घटकांसह सर्वसामान्य नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ त्यांच्या दारापर्यंत पोहोचविण्यासाठी जुलै महिन्यात भव्य 'जनता दरबार' आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा नगराध्यक्ष यू. टी. जाधव यांनी केली आहे. निवडणुकीपूर्वी नागरिकांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याच्या दिशेने हे महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात असून, नागरिकांच्या समस्या थेट ऐकून त्यावर तातडीने कार्यवाही करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

नगराध्यक्ष जाधव म्हणाले, "जनता दरबार हा केवळ तक्रारी ऐकण्याचा कार्यक्रम नसून, प्रत्येक सामान्य नागरिकाला न्याय मिळवून देण्याचा आणि शासनाच्या योजनांचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा लोकाभिमुख उपक्रम असेल. कोणताही पात्र नागरिक योजनांपासून वंचित राहणार नाही, यासाठी प्रशासनामार्फत प्रभावी कार्यवाही केली जाईल."

या जनता दरबारात घरकुल योजना, महसूल विषय, मालमत्ता, पाणीपुरवठा, रस्ते, गटारी, स्वच्छता, वीज, सामाजिक सुरक्षा योजना, शासकीय दाखले, पेन्शन, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, महिला व युवक कल्याण, अतिक्रमण नियमितीकरण, नगरपंचायत व महसूल विभागाशी संबंधित प्रश्न तसेच नागरिकांच्या इतर सर्व समस्या संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ऐकून त्यावर निर्णय घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

राज्य शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर, अमरसिंह (बापू) देशमुख, ब्रह्मानंद पडळकर आणि आनंदराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा भव्य जनता दरबार आयोजित करण्यात येणार असल्याची माहितीही नगराध्यक्ष जाधव यांनी दिली. लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि नागरिक यांच्यात थेट संवाद घडवून आणत अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांना गती देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे.

शहराच्या विकासाला गती देण्याबरोबरच प्रत्येक नागरिकाला शासकीय योजनांचा न्याय्य लाभ मिळावा, हा जनता दरबाराचा मुख्य उद्देश असल्याचे सांगत नगराध्यक्षांनी सर्व नागरिकांना आवश्यक कागदपत्रांसह मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

प्रशासन नागरिकांच्या दारी पोहोचविण्याच्या संकल्पनेतून आयोजित होणारा हा जनता दरबार आटपाडी शहरासाठी एक लोकाभिमुख उपक्रम ठरणार असून, सामान्य नागरिकांच्या अपेक्षांना न्याय देणारा आणि विकास प्रक्रियेला नवी दिशा देणारा उपक्रम म्हणून त्याकडे पाहिले जात आहे.

"गोरगरीब, उपेक्षित व वंचित घटकांना शासनाच्या सर्व योजनांचा लाभ मिळवून देणे हेच आमचे ध्येय आहे. निवडणुकीपूर्वी जनतेला दिलेला प्रत्येक शब्द पाळण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत." — नगराध्यक्ष यू. टी. जाधव

➡️जनता दरबारात कोणते विषय?

घरकुल व गृहनिर्माण योजना...!

पाणीपुरवठा व स्वच्छता...!

रस्ते, गटारी व नागरी सुविधा...!

मालमत्ता, महसूल व अतिक्रमण विषय....!

शासकीय दाखले व विविध प्रमाणपत्रे...!

पेन्शन, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक योजना...!

महिला, युवक व सामाजिक कल्याण योजना...!

नगरपंचायत व महसूल विभागाशी संबंधित प्रलंबित तक्रारी....!

शासनाच्या सर्वसामान्य योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी विशेष मार्गदर्शन....!

To Top