Sanvad News महिलांच्या सक्षमीकरणाचा आदर्श; नागजच्या 'झेप' महिला ग्रामसंघाची वार्षिक सभा उत्साहात

महिलांच्या सक्षमीकरणाचा आदर्श; नागजच्या 'झेप' महिला ग्रामसंघाची वार्षिक सभा उत्साहात

Admin

 महिलांच्या सक्षमीकरणाचा आदर्श; नागजच्या 'झेप' महिला ग्रामसंघाची वार्षिक सभा उत्साहात



उत्कृष्ट स्वयंसहायता समूहांचा गौरव; बचत, स्वयंरोजगार व उद्योजकतेच्या माध्यमातून आत्मनिर्भरतेचा संदेश



आटपाडी kd24news; नागज- दि. १४ (प्रतिनिधी) :उमेद अभियानांतर्गत कार्यरत असलेल्या झेप महिला ग्रामसंघ, नागज यांची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहपूर्ण व शिस्तबद्ध वातावरणात पार पडली. मागील वर्षभरातील कामकाजाचा आढावा, महिला बचत गटांची आर्थिक व सामाजिक प्रगती, तसेच उत्कृष्ट कार्य करणाऱ्या स्वयंसहायता समूहांचा गौरव अशा विविध उपक्रमांनी सभेला प्रेरणादायी स्वरूप प्राप्त झाले.

कार्यक्रमास नागजचे लोकनियुक्त सरपंच तानाजी शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी ग्रामपंचायत सदस्या साधना (राणी) नखाते, ग्रामपंचायत सदस्य जैनुद्दीन अत्तार तसेच सीसी सारिका गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.

सभेच्या अध्यक्षस्थानी झेप महिला ग्रामसंघाच्या अध्यक्षा सौ. सुरेखा पोपट मलमे होत्या. यावेळी ग्रामसंघाच्या लेखापाल सौ. प्रतिभा बाळासाहेब थोरात तसेच नागज गावच्या बँक सखी सौ. प्रियांका होनमाने उपस्थित होत्या.

सभेत मागील वर्षभरातील कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. महिला बचत गटांच्या माध्यमातून ग्रामीण महिलांमध्ये आर्थिक स्वावलंबन, स्वयंरोजगार आणि सामाजिक नेतृत्व विकसित होत असल्याचे अधोरेखित करण्यात आले. उमेद अभियानांतर्गत मागील पाच वर्षांत उल्लेखनीय व उत्कृष्ट कार्य करणाऱ्या स्वयंसहायता समूहांचा प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

यामध्ये प्रथम क्रमांक – प्रगती स्वयंसहायता समूह, द्वितीय क्रमांक – शेतकरी स्वयंसहायता समूह आणि तृतीय क्रमांक – श्री गणेश स्वयंसहायता समूह यांनी मानाचा सन्मान पटकाविला.

यावेळी मार्गदर्शन करताना सरपंच तानाजी शिंदे यांनी महिलांनी बचत, स्वयंरोजगार, उद्योजकता आणि सामाजिक विकासाच्या माध्यमातून आत्मनिर्भर बनावे, असे आवाहन केले. उपस्थित महिलांनीही ग्रामसंघाच्या कार्याचे कौतुक करत भविष्यात अधिक जोमाने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व नियोजन ग्रामसंघाच्या पदाधिकारी व सदस्यांनी केले. शेवटी नागज गावच्या समुदाय संसाधन व्यक्ती (सीआरपी) सौ. मल्लिका लखन तांबोळी यांनी उपस्थित मान्यवर, सर्व महिला सदस्य आणि सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.

To Top