Sanvad News जात-धर्माच्या भिंती ओलांडून आपण सारे भारतीय होणे गरजेचे - कवी नितीन चंदनशिवे यांचे प्रतिपादन

जात-धर्माच्या भिंती ओलांडून आपण सारे भारतीय होणे गरजेचे - कवी नितीन चंदनशिवे यांचे प्रतिपादन

Admin

जात-धर्माच्या भिंती ओलांडून आपण सारे भारतीय होणे गरजेचे

कवी नितीन चंदनशिवे यांचे प्रतिपादन; श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालयात भित्तिपत्रिका व वाङ्मय मंडळाचे उद्घाटन

आटपाडी : “साहित्य माणसाला संस्कार देते आणि संस्कारातून शहाणपण येते; मात्र आजच्या वेगवान जीवनशैलीत संस्कार आणि संवेदनशीलता हरवत चालली आहे. जात, धर्म आणि पंथाच्या भिंती उभ्या राहत असताना आपण सर्वप्रथम भारतीय होणे गरजेचे आहे,” असे परखड प्रतिपादन महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी व वक्ते नितीन चंदनशिवे यांनी केले.

येथील श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालयात विविध भित्तिपत्रिका तसेच वाङ्मय मंडळाच्या उद्घाटनप्रसंगी ‘आम्ही सारे भारतीय’ या विषयावर ते बोलत होते. त्यांच्या अभ्यासपूर्ण, परखड आणि वैचारिक भाषणाने विद्यार्थ्यांना सामाजिक वास्तवाचा आरसा दाखवत विचारप्रवृत्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. शिवाजी विभुते होते. विचारमंचावर भित्तिपत्रिका विभागाचे प्रमुख प्रा. शहाजी पारसे आणि वाङ्मय मंडळाचे प्रमुख प्रा. गणपतराव नांगरे उपस्थित होते. संस्थेचे संस्थापक श्रीमंत बाबासाहेब देशमुख यांच्या प्रतिमेला अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. शहाजी पारसे यांनी करून दिला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण घेत साहित्य आणि वैचारिक क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे नितीन चंदनशिवे हे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी व वक्ते असून त्यांच्या वैचारिक जडणघडणीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा प्रभाव असल्याचे त्यांनी सांगितले.

चंदनशिवे यांनी आपल्या ओघवत्या शैलीत ग्रामीण संस्कृतीच्या ऱ्हासाकडे लक्ष वेधले. “घरातील जातं गेलं आणि जात्यासोबत ओव्याही गेल्या,” या आशयातून त्यांनी बदलत्या जीवनशैलीमुळे लोकपरंपरा, लोकसंस्कृती आणि संस्कारांची होत असलेली पीछेहाट अधोरेखित केली. भारत हा विविधतेने नटलेला देश असून महाराष्ट्राला संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची समृद्ध वैचारिक परंपरा लाभली आहे. या परंपरेने समता, बंधुता आणि माणुसकीचा मार्ग दाखविला आहे. मात्र आज समाजात जातीयता, धार्मिक कट्टरता आणि धर्मवाद वाढत असून माणसामाणसांतील संवेदनशीलता कमी होत असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली.

पेपरफुटी, बेरोजगारी आणि बदलती शिक्षणव्यवस्था यावर भाष्य करताना त्यांनी विद्यार्थ्यांच्या भविष्याचा गंभीर प्रश्न उपस्थित केला. पेपरफुटीमुळे विद्यार्थी आणि पालकांच्या स्वप्नांना तडा जात असून विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा खून होऊ नये, यासाठी शिक्षणव्यवस्थेवर गांभीर्याने काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी काळात शिक्षण आणि शेती या दोन क्षेत्रांना केंद्रस्थानी ठेवून काम करण्याची आवश्यकता असून कष्टकरी, भूमिहीन, शेतकरी आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार केल्याशिवाय देशाची प्रगती पूर्ण होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

तंत्रज्ञानाच्या झपाट्याने होणाऱ्या विस्तारामुळे तरुणांच्या जीवनात मोठे परिवर्तन झाले आहे. मात्र मोबाईलच्या अतिवापरामुळे तरुणांची संवेदनशीलता आणि स्वप्न पाहण्याची क्षमता कमी होत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. “आपल्याला तिरंग्याची आणि देशाच्या भविष्याची स्वप्ने पडली पाहिजेत. नव्या पिढीने मोबाईलच्या पडद्यापलीकडे पाहून देश, समाज आणि स्वतःच्या भविष्याचा विचार केला पाहिजे,” असे आवाहन त्यांनी केले. स्त्रिया आणि मुलींवरील अत्याचार, मुलींची घटती संख्या, बेरोजगारी आणि सामाजिक असुरक्षितता या प्रश्नांवरही त्यांनी परखड भाष्य केले. सावित्रीबाई फुले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा समाजजीवनावर प्रभाव निर्माण होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

अध्यक्षीय मनोगतात प्रभारी प्राचार्य डॉ. शिवाजी विभुते यांनी नितीन चंदनशिवे यांच्या ‘आम्ही सारे भारतीय’ या विषयावरील विचारांचे कौतुक केले. जात, धर्म आणि पंथाच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून जगणे आणि शिक्षणातून खऱ्या अर्थाने शहाणपण प्राप्त करणे ही आजची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. नव्या विचारांना वाट करून देणे आणि विचारांची मशाल तेवत ठेवणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी असल्याचे स्पष्ट करत त्यांनी शिक्षणतज्ज्ञ डॉ. शंकरराव खरात यांच्या शैक्षणिक वाटचालीतील काही अनुभवही विद्यार्थ्यांसमोर मांडले.

कार्यक्रमास सर्जेराव चव्हाण, रुपेशकुमार देशमुख, लक्ष्मण चोथे, दिनेश भिंगे, सुभाष पाटील, प्रशांत चंदनशिवे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापिका, प्रशासकीय कर्मचारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रा. गणपतराव नांगरे यांनी मानले, तर सूत्रसंचालन मराठी विभागप्रमुख डॉ. विजय शिंदे यांनी केले.

To Top