Sanvad News नागपंचमीच्या यात्रेला पुन्हा मिळणार गतवैभव! आटपाडीच्या पारंपरिक यात्रेचे भव्य पुनरुज्जीवन; नगराध्यक्ष यू. टी. जाधव यांचा संकल्प — नगरपंचायतीकडून नियोजनाला वेग

नागपंचमीच्या यात्रेला पुन्हा मिळणार गतवैभव! आटपाडीच्या पारंपरिक यात्रेचे भव्य पुनरुज्जीवन; नगराध्यक्ष यू. टी. जाधव यांचा संकल्प — नगरपंचायतीकडून नियोजनाला वेग

Admin

 नागपंचमीच्या यात्रेला पुन्हा मिळणार गतवैभव!



आटपाडीच्या पारंपरिक यात्रेचे भव्य पुनरुज्जीवन; नगराध्यक्ष यू. टी. जाधव यांचा संकल्प — नगरपंचायतीकडून नियोजनाला वेग

आटपाडी kd24news: आटपाडीकरांच्या भावविश्वाशी आणि परंपरेशी घट्ट नाते असलेल्या नागपंचमीच्या पारंपरिक यात्रेला पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त करून देण्याचा निर्धार आटपाडी नगरपंचायतीने केला आहे. अंबाबाई मंदिर परिसरातील ओढापात्रात दरवर्षी भरणाऱ्या या यात्रेला यंदापासून अधिक भव्य, आकर्षक, सुरक्षित आणि शिस्तबद्ध स्वरूप देण्याचा संकल्प नगराध्यक्ष यू. टी. जाधव यांनी व्यक्त केला. यात्रेच्या नियोजनासाठी नगरपंचायतीत बैठक घेण्यात आली असून, विविध उपाययोजनांना आतापासूनच गती देण्यात आली आहे.

नागपंचमीची यात्रा ही केवळ धार्मिक परंपरा नसून आटपाडीच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे. पूर्वी यात्रेच्या निमित्ताने अंबाबाई मंदिर परिसरात मोठी गर्दी होत असे. विविध प्रकारची खेळणी, पाळणे, मनोरंजनाची साधने, खाद्यपदार्थांची दुकाने यामुळे परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त होत असे. अबालवृद्धांसह माता-भगिनी, महिला आणि बालगोपाळांसाठी ही यात्रा आनंदाचा आणि उत्साहाचा पर्वणीचा क्षण ठरत असे. काळाच्या ओघात यात्रेचे कमी झालेले आकर्षण पुन्हा निर्माण करण्यासाठी नगरपंचायतीने पुढाकार घेतला आहे.

यात्रेच्या पार्श्वभूमीवर ओढापात्राची स्वच्छता व सुशोभीकरण, परिसराची स्वच्छता, खेळणी व पाळण्यांसाठी योग्य व्यवस्था, मनोरंजनाची साधने, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना तसेच गर्दीचे नियोजन करण्यावर भर देण्यात येणार आहे. यात्रेच्या काळात नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी विविध विभागांशी समन्वय साधून नियोजन करण्याची तयारी नगरपंचायतीने सुरू केली आहे.

नगरसेवकांचा सक्रिय सहभाग

यात्रेचे नियोजन केवळ प्रशासनापुरते मर्यादित न ठेवता नगरपंचायतीचे सर्व नगरसेवक सक्रियपणे सहभागी होणार आहेत. यात्रेचे पारंपरिक स्वरूप कायम ठेवत त्याला आधुनिक सुविधांची जोड देण्यावर बैठकीत चर्चा झाली. यात्रेच्या ठिकाणी स्वच्छता, सुरक्षितता, वाहतूक व्यवस्था आणि नागरिकांच्या सोयी-सुविधांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

या बैठकीस गटनेते ऋषीकेश देशमुख, मनोजकुमार पाटील, चंदुभाऊ दौंडे, पै. अजितदादा जाधव, आबासाहेब नांगरे, डॉ. जयंत पाटील, महेश देशमुख, पवन जाधव यांच्यासह नगरपंचायतीचे पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते.

परंपरेला आधुनिकतेची जोड

“नागपंचमीची यात्रा ही आटपाडीची जुनी परंपरा आणि सांस्कृतिक ओळख आहे. या यात्रेला पुन्हा भव्य स्वरूप देऊन आटपाडीकरांना जुन्या आठवणींचा आनंद मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. नागरिकांच्या सहकार्याने यात्रा अधिक आकर्षक, सुरक्षित आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडली जाईल,” असा विश्वास नगराध्यक्ष यू. टी. जाधव यांनी व्यक्त केला.

यंदाच्या नागपंचमीला अंबाबाई मंदिर परिसर पुन्हा यात्रेकरूंच्या गर्दीने फुलणार असून, पाळणे, खेळणी, मनोरंजनाची साधने आणि विविध आकर्षणांनी यात्रेचे मैदान सजण्याची शक्यता आहे. त्यामुळे आटपाडीकरांच्या जुन्या आठवणींना उजाळा देणारी आणि नव्या पिढीलाही आकर्षित करणारी यात्रा यंदा अनुभवायला मिळणार आहे.

परंपरा जपण्यासोबतच यात्रेला नवे रूप देण्याचा नगरपंचायतीचा हा प्रयत्न यशस्वी झाल्यास नागपंचमीची यात्रा पुन्हा एकदा आटपाडीच्या सांस्कृतिक वैभवाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे.

To Top