विटा-भिवघाट मार्गावर दोन एस.टी. बसची भीषण धडक; दोघांचा मृत्यू, ३६ जखमी
रेणावी घाटातील थरारक अपघाताने परिसर हादरला; जखमींमध्ये महिला व अल्पवयीन मुलांचा समावेश
आटपाडी kd24news ; विटा, दि. १४ : विटा-भिवघाट मार्गावरील रेणावी घाटाच्या पहिल्या वळणावर गुरुवारी (दि. १३) सायंकाळी दोन एस.टी. बसची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून, तब्बल ३६ प्रवासी जखमी झाले आहेत. मृतांमध्ये नंदाबाई हरिदास त्रिंबके (वय ६०, रा. खानापूर) आणि धोंडीराम लक्ष्मण पाटील (वय ८०, रा. सासवडे, जि. सातारा) यांचा समावेश आहे. जखमींमध्ये महिला, तरुण तसेच अल्पवयीन मुलांचाही समावेश असल्याने अपघाताची भीषणता अधिक गंभीर झाली आहे.
गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास हा अपघात घडला. विटा आगाराची एस.टी. बस क्रमांक एमएच १४ बीटी ३२५५ विटाहून भिवघाटच्या दिशेने जात होती. याचवेळी मेढा आगाराची एमएच १४ बीटी ४२७० क्रमांकाची एस.टी. बस भिवघाटकडून विट्याच्या दिशेने येत होती.
रेणावी घाटातील उतारावर पहिल्या वळणाजवळ दोन्ही बस समोरासमोर आल्या. यावेळी मेढा आगाराच्या बसने रस्त्याच्या विरुद्ध दिशेला येत विटा आगाराच्या बसला उजव्या बाजूने जोरदार धडक दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. धडक इतकी भीषण होती की दोन्ही बसमधील प्रवाशांमध्ये एकच हाहाकार उडाला. बसमधील प्रवासी जखमी होऊन मदतीसाठी आक्रोश करत होते. अपघाताची माहिती मिळताच मदतकार्याला वेग आला आणि जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले.
या भीषण अपघातात नंदाबाई हरिदास त्रिंबके आणि धोंडीराम लक्ष्मण पाटील यांचा मृत्यू झाला. तर सानिका जितेंद्र सावंत (१७), आरती गोपाळ जाधव (२०), उत्तम वसंत सूर्यवंशी (४७), आनंदा रामा दोडमणी (६५), ताराबाई आनंदा दोडमणी (५५), वनिता देवेंद्र राठोड (३५), देवेंद्र बिरसिंग राठोड (४२), जयश्री राजू राठोड (३२), राजू गोपू राठोड (३६), रणधीर हणमंत पाटील (४९), सारिका रणधीर पाटील (४३), गौरी रामभाऊ पाखरे (३९), श्रावणी मल्हारी तुपे (१७), स्नेहा संजय खिलारे (१७), तमन्ना रफिक मुलाणी (१८), सुजाता संतोष जाधव (३८), अंकुश विठोबा जावीर (५०), प्रतीक्षा बाळासाहेब पवार (१९), लता बाबासाहेब भंडारे (५०), वैष्णवी हणमत पवार (१७), सुमित्रा चंदू राठोड (१७), वर्षा लक्ष्मीकांत कुंभार (३३), साक्षी चंद्रकांत पवार (१७), सावित्री गोपाळ जाधव (३८), अश्विनी गजानन गवळी, सिद्धी लक्ष्मीकांत कुंभार (७), अमर यशवंत जाधव (३०), दिपाली अमर जाधव (२५), दिव्यलक्ष्मी तुकाराम पवार (१२), जगन्नाथ दगडू पाटील (७०), अनुराधा तुकाराम जाधव (१९), लिगाप्पा यमनाप्पा कोळी (५०), मलाप्पा सदबा धनगर (४०), बिराप्पा शाबान्ना देवानागाव (२५), शेकाप्पा तिपान्ना जडगे (५५) आणि नागन्मा शेकाप्पा जडगे (५०) हे जखमी झाले आहेत.
जखमींमध्ये खानापूर, रेणावी, ऐनवाडी, रेवणगाव, कुर्ली, चिंचणी आबक, ढालेवाडी, आटपाडी, विजापूर तसेच सातारा परिसरातील प्रवाशांचा समावेश आहे. एकाच अपघातात विविध गावांतील प्रवासी जखमी झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यासाठी स्थानिक नागरिकांसह संबंधित यंत्रणांनी मदत केली. या दुर्घटनेमुळे विटा-भिवघाट मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
या घटनेची नोंद विटा पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, अपघाताच्या कारणाचा आणि घटनेच्या संपूर्ण परिस्थितीचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
